
कोल्हापूर जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी मंगळवार पासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यापुर्वी दोन वेळा पात्रालगत वाहणाऱ्या पंचगंगा नदीचे पाणी आज सकाळी यंदा प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. मंगळवारी सकाळी आठ पासुन ते आज सकाळी अकरा पर्यंत तब्बल १८.५ फुटांची वाढ होऊन, पातळी ३३.३ फुट झाली होती. रात्रभर संततधार कोसळणारा पाऊस आज थांबण्याची चिन्हे नसल्याने,पंचगंगेची वाटचाल ३९ फुटाच्या इशारा पातळीकडे सुरू होती. धोकापातळी ४३ फुट आहे. दरम्यान सध्या ८६ बंधारे पाण्याखाली गेले असुन, अनेक मार्ग बंद झाले आहेत.तर नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३१७ मिमी
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर हातकणंगले-३८.३८,शिरोळ- २५.८६,पन्हाळा-८८.२९,शाहूवाडी-६४,राधानगरी -१०२.५०,करवीर-७०.२७,कागल-९०.२९,
गडहिंग्लज-५५,भुदरगड-७२.४०,आजरा-११६ आणि चंदगड-१५५ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.
राधानगरीच्या विद्युत विमोचकातुन १४०० तर अलमट्टीतून ६९२२ क्युसेक विसर्ग
जिल्ह्यातील राधानगरी धरणात सध्या १९९.८९ दलघमी (८४%) पाणीसाठा असुन,आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.धरणाचे स्वयंचलित दरवाजे असुन, शंभर टक्के धरण भरल्यानंतरच ते उघडतात. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात सध्या ६०.२९ टीएमसी पाणीसाठा आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणात ९०.८६४ टिएमसी इतका पाणीसाठा असुन,६ हजार ९२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान जिल्ह्यात तुळशी (६२%),वारणा (७७%) , दूधगंगा (७४%),कासारी (८०%),कडवी (६८%) ,कुंभी (८१%),पाटगाव (७८%),चिकोत्रा (५६%), चित्री (६४%),जंगमहट्टी (८४%) तर घटप्रभा, जांबरे व कोदे (ल. पा.) हि शंभर टक्के भरली आहेत.
८६ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर,राजाराम,सुर्वे,रूई, इचलकरंजी,तेरवाड व शिरोळ,भोगावती नदी वरील-शिरगाव,राशिवडे,हळदी,खडक कोगे व सरकारी कोगे,वारणा नदीवरील-चिंचोली व माणगाव,कुंभी नदीवरील- शेणवडे,मांडुकली, सांगशी,असळज व सांगरूळ, धामणी नदीवरील- सुळे,अंबर्डे, पनोरे,गवशी,म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील-कुंभेवाडी,कांटे,करंजफेण, पेंडाखळे,बाजारभोगाव,वालोली,पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज,वेदगंगा नदीवरील-निळपण,वाघापूर,शेणगाव,गारगोटी,म्हसवे, कुरणी,सुरूपली,बस्तवडे,चिखली व शेलोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव,ऐनापूर,गिजवणे व निलजी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी,चंदगड व हल्लारवाडी,घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली,हिंडगाव,कानडी सावर्डी व अडकूर, तुळशी नदीवरील- घुंगुरवाडी,कांचनवाडी, बाचणी ,आरे व बीड आदी ८६ बंधारे पाण्याखाली गेले होते.




























































