मालवणच्या सुपुत्राची देशात पताका, चिंदर गावाच्या सुब्रमण्य केळकरचे ‘यूपीएससी’त घवघवीत यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील चिंदर गावाचे रहिवासी असलेल्या सुब्रमण्य भालचंद्र केळकर (वय 27)मूळ आचरा पारवाडी याने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मातृभाषेतून देशात 497 क्रमांक येऊन घवघवीत असे यश संपादन करत मालवणची (सिंधुदुर्ग) पताका देशात फडकवली आहे. सर्व स्तरातून सुब्रमण्य याचे कौतुक होत आहे.

सुब्रमण्य भालचंद्र केळकरचे प्राथमिक शिक्षण चिंदर तर माध्यमिक शिक्षण त्रिंबक येथे मराठी माध्यमातून झाले. महाविद्यालयीन शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवण येथे झाले. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले.

मागील 3 वर्षे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेसाठी मराठी माध्यमातून सुब्रमण्य भालचंद्र केळकरने प्रयत्न चालू केला होता. पुण्यातील चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेत अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा अभ्यास त्याने केला. यूपीएससी पूर्वपरीक्षा पास होत मुख्य परीक्षा त्याने दिली. एका प्रयत्नात मुलाखतीमध्ये 11 मार्क कमी मिळाल्याने निवड राहिलेली होती. मात्र अथक मेहनतीच्या व प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग केल्याने देशात 497 रँकने त्याची निवड झाली.

यूपीएससी टॉपर नेहा भोसले हिचा सत्कार

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खोपी गावची सुकन्या नेहा भोसले हिने यूपीएससी परीक्षेत महाराष्टातून प्रथम तर देशातून 15वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल सातगाव ग्रामकिकास प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नेहा हिला प्रतिष्ठानच्या वतीने गौरविण्यात येणार आहे असे प्रतिष्ठानचे मुख्य कार्यवाह देवराम भोसले, सहकार्यवाह, स्थानिक लोकाधिकार समितीचे वामन भोसले यांनी स्पष्ट केले. नेहा हिने एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून तिचे आईवडील प्रकाश आणि अमृता भोसले राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्मचारी होते.