शिक्षणाला मिळणार तंत्रज्ञानाची जोड, गुगल क्लासरुममची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोटय़वधी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी राज्य सरकारच्या मदतीला गुगल पुढे सरसावले आहे. गुगलच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध उपाययोजना आखत विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्र आणण्याचा अभिनक प्रयोग या माध्यमातून केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नव्या प्रयोगाची आज अधिकृत घोषणा केली असून गुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षणाचा नवा अध्याय आता राज्यात लिहिला जाणार आहे.

या नव्या गुगल क्लासरुमच्या माध्यमातून जी स्कीट फॉर एज्युकेशन, गुगल क्लासरुम, गुगल फॉर्म आणि गुगल असाइनमेंटस यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने नवा शैक्षणिक मार्ग सुरु करताना यात अनेक नव्या कल्पनांचा फायदा आता शिक्षणासाठी केला जाणार आहे. या नव्या गोष्टींचा नेमका फायदा कसा होणार आहे, याचा घेतलेला हा आढावा.

गुगल फॉर्म
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी गुगल फॉर्म ही अनेक कारणांसाठी उपयुक्त ठरणारी सुविधा आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणासंदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी उपयुक्त साधन मानले जाते. फॉर्मच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची परीक्षा घेणेदेखील सहज सोपे होणार आहे. या फॉर्ममध्ये प्रश्न दिल्यानंतर त्याची लिंक विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून त्या माध्यमातून त्यांची परीक्षा घेणे सोपे होणार आहे. याशिवाय या फिचर्सच्या माध्यमातून दहा प्रकारचे फॉर्म बनविता येऊ शकणार आहेत. फॉर्मच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची माहिती थेट गुगल ड्राईव्हमध्ये सेक्ह करता येणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वेळेचीदेखील बचत होणार आहे.

गुगल असाइनमेंटस
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत गुगल असाइनमेंटस मोलाची भूमिका बजावतो. विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याबरोबरच इतर प्रकल्प तयार करण्याची सूचना या माध्यमातून देऊ शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखादा गृहपाठ किंवा इतर काम दिल्यास त्याची माहिती विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून मिळणार आहे. या माध्यमातून देण्यात आलेला गृहपाठ किंवा इतर माहिती गुगल क्लारुममध्ये समाविष्ट असलेल्या गुगल कॅलेंडरशी देखील जोडला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास केव्हाही पाहता येणार आहे.

शिक्षणासाठी जी स्कीट
जी स्कीट हा गुगलने शिक्षणासाठी सुरु केलेले एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून जीमेलच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मोफत दिले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच हे नवीन फीचर गुगलने जाहीर केले आहे. ज्यात क्लासरुम, गुगल फॉर्म आणि इतर अनेक माध्यमातून विर्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे सहज सोपे होणार आहे. मोबाईल,कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर ही सुविधा मोफत सुरु करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी असणे आवश्यक असणार आहे. या सुविधेत शिक्षकांना युटय़ूब, ब्लॉग आणि गुगल मॅपसारख्या इतर अन्य बाबींचादेखील वापर करता येणार आहे. जी स्कीटच्या वापर केल्यास एका वर्गात जास्तीत जास्त हजार विद्यार्थी भाग घेऊ शकणार आहेत.

गुगल क्लासरूम
गुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शिकवणीचे वर्ग भरवू शकतात. यासाठी जीमेलचे ईमेल आयडी आवश्यक असून त्याद्वारे विद्यार्थी या वर्गात भाग घेऊ शकतात. या क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षकांना ऑनलाईन धडे देणे सहज सोपे असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखादा प्रकल्प, एखादी घोषणा आणि प्रश्न शेअर करता येणार आहे. आपल्याला दिलेला अभ्यास किंवा इतर माहिती विद्यार्थ्याना गुगल क्लासरुमच्या कॅलेंडर भागात पाहता येईल. या क्लासरूममध्ये शिक्षकांना एखादा व्हिडिओ आणि सादरीकरण देणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वेळेची बचत होणार आहे. क्लासरुममध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात येत नसल्याने विद्यार्थ्यांना विना अडथळा शिक्षणाचे धडे देता येणार आहे. क्लासरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पालकांनादेखील नजर ठेवता येऊ शकणार आहे. यातून पालक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची समरी शेअर करू शकणार आहेत.