कोल्हापूर : कोयना धरण 80 टक्के भरल्यानंतरच विसर्ग, सध्या परिस्थिती नियंत्रणात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या 69.11 टक्के असलेले कोयना धरण 80 टक्के भरल्यानंतरच त्यातून विसर्ग करण्यात येणार आहे. तर 78.57 टक्के भरलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. शिवाय ऐतिहासिक राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडून सुद्धा पावसाचे कमी अधिक प्रमाण पाहता, कोल्हापुरात उद्भवलेली महापुराची परिस्थिती तुर्त नियंत्रणात आहे.

पंचगंगेची पातळी 43 फुट धोकापातळी वरुन सकाळी 11 च्या सुमारास 44.9 फुटांवर पोहोचली होती. पंचगंगेसह सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला असून, नागरी वस्तीसह शेत शिवारात ही पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात घुसले आहे. 95 बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर- रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गासह 10 राज्यमार्ग, 28 प्रमुख जिल्हा मार्ग, 16 इतर जिल्हा मार्ग, 19 ग्रामीण मार्ग असे 74 मार्ग बंद असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

गेल्या वर्षीचा महापुराचा अनुभव पाहता पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे.

गगनबावडा, चंदगडमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यात काल दिवसभरात सर्वत्र पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहिला.गगनबावडा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली.गगनबावडा तालुक्यात 148.50 तर चंदगड तालुक्यात 104.67 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शिवाय हातकणंगले- 12.38,शिरोळ-7.29, पन्हाळा-69.14, शाहूवाडी- 50.50, राधानगरी- 76.83, करवीर- 25.64, कागल-39.71, गडहिंग्लज-24.14,भुदरगड-47.80, आजरा- 79.25 अशी पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरीतून 7 हजार 112 विसर्ग

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दुरदृष्टीतुन साकारलेला आणि जिल्हा सुजलाम सुफलाम करणारे राधानगरी धरण काल गुरुवारी शंभर टक्के भरले.सायंकाळी 7 च्या सुमारास 3 आणि 5 क्रमांकांचे,रात्री 11.15 च्या सुमारास 6 तर मध्यरात्री तीनच्या सुमारास 4 क्रमांकांचा असे चार स्वयंचलित दरवाजे उघडले.सध्या राधानगरी धरणातुन विद्युत विमोचकातील 1400 सह या चारही स्वयंचलित दरवाजातुन 5 हजार 712 असा एकुण 7 हजार 112 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

धरणे भरण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात तुळशी (74),वारणा (84),दूधगंगा (83),कासारी (90),कडवी (80),कुंभी (82), पाटगाव (88),चिकोत्रा (62),चित्री (80) अशी धरणांची सध्या भरलेली टक्केवारी आहे. तर जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे तसेच कोदे (ल.पा.) हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.

सध्या वारणा- 4 हजार 400, दुधगंगा- 1000, कासारी- 1 हजार 350, कुंभी-300, जंगमहट्टी- 290,घटप्रभा-3 हजार 477, जांबरे-1970 आणि कोदे (लपा) मधुन 1 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

स्थलांतरास सुरुवात

गेल्या वर्षीचा महापुराचा अनुभव पाहता पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे.काल रात्री उशिरापर्यंत करवीर,गडहिंग्लज ,पन्हाळा,गगनबावडा,चंदगड,आजरा या तालुक्यातील २३ गावांतील १ हजार ७५० कुटुंबातील ४ हजार ४१३ व्यक्ती आणि १ हजार १०० जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले होते.तसेच कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील २० कुटूंबातील ७४ नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.