
पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथील शिक्षकाचे थकित वेतन काढण्यासाठी लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे.
पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथील जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षकाचे 2019चे वेतन काढण्यासाठी 500 रुपये व 2020चे आज पर्यंतचे वेतन काढण्यासाठी 300 रुपयांची मागणी केली होती. फिर्यादी शिक्षकाची लाचेची रक्कम देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी सोमवार, 10 ऑगस्ट रोजी सापळा रचून 800 रुपयांची रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापक प्रकाश अर्जुन अंभुरे यास रंगेहात पकडले. सदर मुख्याध्यपक सेलू तालुक्यातील गुगळी धामनगांव येथील जि.प. प्राथमिक शाळेचा असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
ही कामगिरी कल्पना बारवकर, पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, भरत हुंबे, पोलीस उपअधिक्षक, ला. प्र.वि. परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी राजेश पुरी पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार हनुमंते, पोलीस नाईक कटारे, पोलीस शिपाई धबडगे, कदम यांनी केली.



























































