तहसीलदाराच्या पतीकडून जीवाला धोका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराची पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्या पासून आपल्या जीवाला धोका आहे. गुंड प्रवृत्तीच्या असणाऱ्या बाळासाहेब आमले यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी रविवारी खेड पोलीस ठाण्यात केली.

आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे की सचित्र आमले यांची खेडच्या तहसीलदारपदी नेमणूक झाल्यावर तालुक्यामध्ये अवैध धंदे बोकाळले आहेत. जमिनीच्या नोंदी, दाखले, रेशन कार्ड, आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड होत आहेत. तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराबद्दल अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी आणि नागरिकांनी तक्रारी केल्यावर आपण लोकप्रतिनिधी या नात्याने चौकशी सुरू केली. त्यानंतर तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची थेट वक्तव्ये केली. त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही. मात्र हा माणूस गुंड प्रवृत्तीचा असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार आणि त्यांचे बाळासाहेब यांना जबाबदार धरावे असेही आमदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात येईल, दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.