
जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिह्यात लष्कराने मंगळवारी तीन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी कारवायांचे सावट असतानाच लष्कराने ही मोठी कारवाई केली. जम्मू-कश्मीर पोलिसांच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी सुरक्षा यंत्रणांनी कुपवाडा जिह्यातील लालपोरा परिसरात शोध मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान तीन संशयित दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून एक रायफल (एके), दोन पिस्तुल तसेच इतर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून दहशतवादी कारवायांचा कट आखला जाण्याची भीती होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी गोपनीय माहितीच्या आधारे वेळीच कारवाई करून संशयित दहशतवाद्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. त्यांची सध्या सुरक्षा यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जात आहे.























































