माटुंग्याच्या ‘ताहेर मेन्शन’चे स्लॅब कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माटुंगा पूर्व येथील ‘ताहेर मेन्शन’ या 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि दुरवस्था झालेल्या इमारतीचे पुन्हा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी या धोकादायक इमारतीत राहणार्‍या बारा कुटुंबांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

माटुंगा येथील प्लॉट नंबर 126, तेलंग क्रॉस रोड जवळील ‘ताहेर मेन्शन’ या उपकरप्राप्त इमारतीची स्थिती सध्या बिकट झाली आहे. ग्राऊंड प्लस तीन माळ्यांच्या या इमारतीला अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. भिंतींना मोठमोठ्या भेगा गेल्या आहेत. इमारतीचे स्लॅब वारंवार कोसळत आहे. छपरालादेखील ठिकठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. भिंतींना भेगा गेल्या असून छपराला गळती लागली आहे. याबाबत पालिकेकडून ‘म्हाडा’ला आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठवूनही कार्यवाही होत नसल्याने रहिवासी भीतीच्या छायेखाली राहत आहे. यातच वारंवार स्लॅब कोसळत असल्याने रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.