आपुलाचि वाद आपणासी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक हांडे

तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचि वाद आपणासी… संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळीप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात माझाही ‘आपुलाचि वाद आपणासी’ सुरू आहे. आयुष्याचा धांडोळा घेतोय. अनेक माणसं डोळ्यांसमोर उभी राहताहेत. अनेक लोकांनी आपल्यावर केलेले उपकार, गुरुजनांचे आशीर्काद यांचं स्मरण होतंय. खरं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मी स्मरणरंजनात आहे.

एप्रिलपासून आता ऑगस्ट महिन्यापर्यंत मी टीव्ही बघितला नाही, बातम्या बघितल्या नाहीत. माझा चार वर्षांचा नातू, निवान याला पूर्ण वेळ देतोय. त्याच्याकडून मी 60-70 गाणी बसवून घेतली. मला आठवतं तसं त्याला मी सांगत जातो. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार द्याल तशी मूर्ती घडते. आताही गो.नी. दांडेकर यांच्या पुस्तकातील गडकिल्ल्याची माहिती त्याला सांगतोय.

आमच्या चौरंग या संस्थेने 34व्या वर्षात पदार्पण केले आहे. आमचे 17 ते 18 कार्यक्रम आहेत. मराठी बाणा, मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, गाने सुहाने, गंगा जमुना अत्र अत्रे सर्कत्र, मी यशवंत असे बरेच कार्यक्रम आहे. ‘मंगलगाणी दंगलगाणी’पासून आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला खूप नुकसान सोसलं, पण हिंमत सोडली नाही. 1992 साली लंडनला गेलो. तिथे कार्यक्रम करायला मिळाला. जणू गोदावरी, कृष्णा कोयनेचे पाणी थेम्स नदीत आम्ही सोडलं. लंडनमध्ये कार्यक्रम केल्यावर आम्ही मागे वळून बघितले नाही. हा सारा प्रवास, त्यातील चांगले- वाईट अनुभव आता आठवतोय.

दररोज शो करायचा, सिझनला आंब्याचा व्यवसाय करायचा. आताही लॉकडाऊनमध्ये आंब्याचा धंदा इमानेइतबारे केला. मार्च, एप्रिल, मे तीन महिने एपीएमसी मार्केटमध्ये मी जायचो. अगदी आगीच्या ज्वालेवर धंदा केला. सांगायचा मुद्दा हा की, आपण कधी उसंत घेत नाही. मला स्वत:ची संवाद करायला वेळ नव्हता. त्याची गरज वाटली नाही आणि ते सुचलंही नाही. ती उसंत आता मिळाली. आपल्या स्वभावात, दृष्टिकोनात, अगदी आपल्या कार्यक्रमात कसा बदलता येईल, हा विचार करत आहे. संकटं येतात, संकटं जातात. जीवनाची उमेद कायम रहाते. हे आयुष्याचं चांगलं गणित आहे. महामारी येते महामारी जाते, जगरहाटी अव्याहतपणे सुरू राहील.

कलाकारांची अवस्था हालाखीची

आमच्या ‘मराठी बाणा’ आणि ‘चौरंग’च्या सर्क टीमचे सुमारे 150 कलाकार आहेत. कार्यक्रम बंद असल्याने अर्थार्जन पूर्ण बंद आहे. चौरंग संस्थेतील फार कमी लोक इतर ठिकाणी नोकरी करतात. कार्यक्रमावर अवलंबून असणारे जास्त आहेत. ते कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांना नुकसानभरपाई म्हणून मी महिन्याला काहीतरी देतोय. तीन ते चार हजार रुपयांची तेलामीठाला मदत करतोय. त्यापेक्षा मी असं म्हणेन माझं कर्तव्य बजावतोय. त्यात दमछाक होतेय. कलेची भूक ती वेगळी आहे. पण त्याचबरोबर दीडशे कुटुंबाचं अर्थार्जन थांबलंय याचं अतिशय वाईट वाटतंय. हे वादक, गायक कलाकार असंघटित असल्याने कुठून मदत मिळाली नाही. कलाकारांची अतिशय हालाखीची परिस्थिती आहे.