
पालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांत तसेच पालिकेच्या मालमत्तांच्या सुरक्षेसाठी हजारो सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत असतात. मात्र, पालिकेत सुरक्षारक्षकांची 1,456 पदे अजूनही रिक्त असल्यामुळे आहे त्या सुरक्षारक्षकांवर ताण वाढला आहे.
मुंबई पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी नवीन भरती प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांची सुरक्षेची जबाबदारी चोख बजावणार्या सुरक्षा अधिकारी व रक्षकांवर अपुऱया कर्मचाऱयाअभावी कामाचा ताण वाढत आहे. यामुळे पालिकेच्या मालमत्तेचे रक्षण करणाऱया अधिकारी व रक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
मुंबई महापालिकेचे सीएसटी येथील मुख्यालय, 24 विभाग कार्यालये, गोदाम, मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरण या ठिकाणची सुरक्षेची जबाबदारी अधिकारी व रक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सध्या 50 सुरक्षा अधिकारी व 2,400 सुरक्षारक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु मनुष्यबळ कमी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी व रक्षकांवर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांची रिक्त पदे भरावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेत सध्या सर्व विभागात भरती बंद आहे. पालिका सुरक्षा विभागातही सध्या 1,456 सुरक्षारक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, जिथे सुरक्षारक्षकांची गरज आहे तिथे महाराष्ट्र सुरक्षा बल आणि ठाणे जिल्हा बोर्डमधील सुरक्षारक्षकांची मदत घेतली जात आहे. पालिकेची रुग्णालये, कोरोना सेंटर्स येथे हे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. – रवींद्र पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी, पालिका






























































