
शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरातील दुकानदारांना वस्तू खरेदीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून गल्ल्यातील रोकड चोरणाऱ्या सराईत भावडांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्यांच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. दीपक किशोर चौधरी आणि अभिजीत किशोर चौधरी (दोघेही रा. मांगडेवाडी, कात्रज ) अशी अटक केलेल्या भावडांची नावे आहेत. याप्रकरणी अखिल महमंद (वय 19, रा. कोंढवा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील दुकानादारांना बोलण्यात गुंतवून रक्कम लुटणारी टोळी सक्रिय होती. मागील चार दिवसांत टोळीने तीन दुकानदारांना गंडा घातला होता. त्यामध्ये दीपक आणि अभिजीत या दोन सराईत भावडांचा समावेश आहे. कर्वेरस्त्यावरील कारपेट दुकानात खरेदीच्या बहाण्याने टोळीने 5 हजारांची रोकड चोरुन नेली होती. त्याशिवाय डेक्कन परिसरातील गोविंद शॉपीमध्ये दुधाची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने टोळीने जेष्ठ महिलेची नजर चुकवून 1 हजार 800 रुपयांची रोकड चोरुन नेली होती. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजद्वारे टोळीचा शोध घेण्यास डेक्कन पोलिसांनी यश आले असून दोघा भावाडांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी शहरातील विविध भागात अशाप्रकारे चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दुकानदारांना बोलण्यात गुंतवणूक टोळीकडून गल्ल्यातील रोकड चोरी केली जात होती. त्यानुसार सीसीटीव्हीच्या आधारे टोळीची माहिती काढून दीपक आणि अभिजीत चौधरी या दोन सराईत भावडांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे. – व्ही. एल. झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे




























































