सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनाने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील संत प्रवृत्तीचे लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. सुधाकर पंत यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोलापूर जिह्यात शोक पसरला. आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती.

सुधाकरपंत परिचारक यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये सोलापूर जिह्याच्या राजकारणाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. सुधाकरपंत हे 1985 ते 2009 पर्यंत सलग पंचवीस वर्षे पंढरपूरचे आमदार होते. त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभारणीत सक्रिय सहभाग नोंदविला. 2000 ते 2007 या कालावधीत सुधाकरपंत परिचारक हे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष होते. तोटय़ात असणारे महामंडळ नफ्यात आणून त्यांनी आपल्या कामाची प्रचिती दिली होती. राजकारण, समाजकारण आणि सहकार या तीनही क्षेत्रात पंतांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला. सुधारकरपंत परिचारक यांच्या निधनाने पांडुरंग परिवाराचा आधारवड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.