
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा कोरोनामुळे झालेला मृत्यू या तिघांसाठी धक्कादायक होता. तुफान पावसामुळे फुगलेल्या नदीने रौद्ररुप धारण केले असतानाही या तिघांनी त्यात उडी मारत आपले जीवन संपवले. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कोवुरू भागात असलेल्या रेल्वेच्या पुलावरून या तिघांनी उडी मारली होती असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
कुमार (बदललेले नाव) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर राजमुंद्री इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 16 ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले होते. पतीचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर आल्यानंतर लक्ष्मी (नाव बदललेले) यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. त्यांची मुले रोहन आणि लता (दोघांचीही नावे बदललेली ) हे देखील वडिलांच्या मृत्यूच्या बातमीने हादरले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांप्रती कोणीही सहानुभूती दाखवली नाही, जे लक्ष्मी आणि तिच्या मुलांसाठी आणखीनच धक्कादायक होते. यामुळे या तिघांनी जीव द्यायचे ठरवले होते. हे तिघेजण बुधवारी पहाटे 1 वाजता कारमधून कोवुरू इथल्या पुलावर गेले आणि तिथून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली.
कोवुरूचे पोलीस अधीक्षक के. राजेश्वर रेड्डी यांनी सांगितलं आहे की या तिघांनी गाडीमध्ये एक सुसाईड नोटही ठेवली होती. यामध्ये वडिलांच्या जाण्याने आपल्याला धक्का बसला असल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचं लिहलं होतं. रोहन याने खाणकामासंदर्भातील शिक्षण घेतलं होतं आणि त्याने पदवी मिळवत असताना सुवर्ण पदकही प्राप्त केलेलं होतं. तो गुजरातमध्ये चांगल्या नोकरीवर होता अशी माहिती मिळाली आहे. रोहनची बहीण लता हिची एका आयटी कंपनीमध्ये कँपसमधून निवड करण्यात आली होती. कोरोनाच्या जीवघेण्या आजारामुळे एक हसतं खेळत कुटुंब उध्वस्त झाल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.





























































