
गुजरातच्या केवडिया भागात उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफचे सुरक्षा कवच मिळणार आहे. केंद्र सरकारने या अर्ध सैनिक दलाच्या जवानांच्या या पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी तैनातीला परवानगी दिली आहे. या दलाची सुरक्षा प्रामुख्याने मुख्य विमानतळे, दिल्ली मेट्रो आणि अन्य संवेदनशील ठिकाणी तैनात केलेली आहे.
272 जवान तैनात करणार
केंद्रीय गृहमंत्रालयाने या दलाच्या जवानांच्या तैनातीला मंजुरी दिली असून 25 ऑगस्टपासून या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी 272 जवान तैनात केले जातील. केवडिया येथील हा पुतळा देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा असून हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याची उंची 597 फूट इतकी आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. कोरोनामुळे सध्या हा पुतळा आणि आसपासचा परिसर नागरिकांना पाहता येत नाहीये. पुढच्या महिन्यात हा परिसर आणि पुतळा पाहण्यासाठी खुला करण्याबाबत गुजरात सरकार विचार करत आहे.
सरदार पटेल यांचा जगातला सर्वात मोठा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जगातील आठव्या आश्चर्यांमध्ये समावेश झाला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही माहिती जानेवारी महिन्यात दिली होती. मंत्री जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटले होते की, शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनने स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जगातील आठव्या आश्चर्यात समावेश केला आहे. शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनही आंतरराष्ट्रीय संस्था असून त्यात हिंदुस्थान, पाकिस्तान, चीन, कझाकिस्तान, रशिया या देशांचा समावेश आहे.
गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात हा पुतळा असून आठव्या आश्चर्यात समावेश झाल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच केवडियाच्या लोकांनाही रोजगार मिळणार आहे. एससीओचे सदस्य राष्ट्रसुद्धा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्रचार करणार आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्वात उंच पुतळ्याचा (597 फूट) जगातील 100 महान ठिकाणांमध्ये समावेश करण्यात आला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून ही ‘जबरदस्त बातमी’ असल्याचे म्हटले होते. कमी कालावधीमध्ये हे ठिकाण पर्यटकांचे आवडते झाले असल्याचेही ते म्हणाले होते. ‘जबरदस्त बातमी! टाइम्स मॅगझीनने 2019 मधील 100 महान ठिकाणांमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’चा समावेश केला आहे. काही दिवसांपूर्वी येथे एका दिवसात विक्रमी 34 हजार पर्यटकांनी भेट दिली होती. पर्यटकांना भेट देण्यासाठी हे आवडतीचे ठिकाण असल्याचे पाहून मला आनंद झाला आहे’, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
























































