
गुजरातमधल्या कच्छ भागातील मुंद्रा गावात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. जेरामसार तलावात त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह हाती लागला. मंगळवारी त्याने या तलावात उडी मारल्यापासून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून तक्रार दाखल केली असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
भुजमधल्या अग्निशमन दलाचे जवान आणि गांधीधाम इथल्या आपात्कालीन परिस्थिती प्रतिसाद केंद्राच्या जवानांना या तरुणाच्या शोधासाठी बोलावण्यात आलं होतं. या जवानांनी बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास तरुणाचा मृतदेह शोधून काढला. जाकीर कारा ( 25वर्षे) असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जाकीर हा जामनगरच्या बेडी गावचा रहिवासी होता आणि तो शेतमजुरीचे काम करायचा.
जेरामसार तलाव हा 15 वर्षानंतर ओसंडून वाहायला लागला आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यात नारळ फेकण्याचा कार्यक्रम ठरला होता. गावचे सरपंच धरमसिह जेसार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सरपंचाने तलावात फेकलेला नारळ बाहेर काढणाऱ्याला बक्षिस दिलं जाणार होता. जेसार यांनी फेकलेला नारळ पकडण्यासाठी 4-5 तरुणांनी उड्या मारल्या ज्यामध्ये जाकीर काराचाही समावेश होता. मांडवी भागाचे भाजप आमदार विरेंद्रसिंह जाडेजा हे देखील या कार्यक्रमाला हजर होते हे विशेष
नारळ पकडण्यासाठी उडी मारणारे बाकी सगळे काठावर परतले, मात्र कारा परतला नाही. बक्षिस मिळवण्यासाठी नारळ पकडण्याच्या नादात तो वाहून गेला होता. त्याला वाहून जाताना बऱ्याच जणांनी पाहिले होते. NDRF च्या जवानांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना तो सापडला नाही. मुंद्रा पोलीस ठाण्याचे बी.जे. भट्ट यांनी म्हटले की असा कोणता कार्यक्रम होणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. या कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यात आलेली नव्हती. खरंतर तिथे कार्यक्रम आयोजित केला नव्हता तर काही जण तलाव भरल्याच्या आनंदात एकत्र आली होती असं त्यांचं म्हणणं आहे. पोलीस जरी असं म्हणत असलं तरी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तलावाच्या बाजूला मुंद्रा ग्रामपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अभिनंदन करणारे फलकही लावण्यात आले होते.






















































