
कोल्हापूर जिल्ह्यात आजही धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात राहिला. धोकापातळी वरून वाहणार्या सर्वच नद्यांचे पाणी पुन्हा पात्रालगत स्थिरावले आहे. सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांत पंचगंगेची पाणीपातळी सुमारे तीन फुटांहुन अधिक कमी झाली होती. तर सकाळी आठ पासुन सायंकाळी 4 पर्यंत आणखी अर्धा फुट कमी होऊन 36.10 फुट झाली होती. तासाला इंचाने पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 97 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणात 236.57 दलघमी पाणीसाठा असुन, काल रात्री धरणाचे 3 आणि 6 क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहे. सकाळी धरणातून 4 हजार 256 क्युसेक विसर्ग सुरू होता. आज सायंकाळी पुन्हा 5 आणि 4 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले. त्यामुळे राधानगरी धरणाचे एकुण चार स्वयंचलित दरवाजे उघडले असुन, एकुण 7 हजार 112 क्युसेक विसर्ग सुरू होता.
तर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून सायंकाळपर्यंत 12 हजार 59 क्युसेक विसर्ग सुरू होता. धरण परिचलनासाठी विसर्गात आणखी दहा ते पंधरा हजार क्युसेक वाढ करण्यात येणार असल्याने सायंकाळी साडेपाच नंतर एकुण 25 हजार पर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने कळविले आहे.
दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरणात 99.464 टीएमसी पाणीसाठा असुन आजही अलमट्टीतुन 2 लाख 51 हजार 922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

























































