
सोशल मीडियातील राजा असलेले फेसबुक आणि सध्या देशाचा कारभार चालवणारे भाजप तसेच भाजपची पितृसंस्था मानली जाणारी आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या वादात सापडल्याचे दिसत आहे आणि याला कारणीभूत आहे ती ’वॉल स्ट्रीट जर्नल’ या वर्तमानपत्राने दिलेली बातमी. ’वॉल स्ट्रीट जर्नल’ने फेसबुकच्या काही आजी आणि माजी कर्मचाऱ्य़ांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार फेसबुकने भाजपच्या काही नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या धार्मिक वाद निर्माण करणाऱ्य़ा पोस्टकडे काणाडोळा करत त्या तशाच राहू दिल्या. या पोस्ट वास्तविक समाजात तेढ निर्माण करणाऱ्य़ा असल्याने लगेच काढून टाकल्या जायला हव्या होत्या मात्र फेसबुकने त्या तशाच राहू दिल्या. असा विरोधकांचा आक्षेप आहे.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या या बातमीमुळे विरोधी पक्षांनी भाजपला कोंडीत पकडले. त्याशिवाय राजकीय निरीक्षकांनी 2014 आणि 2019 साली भाजपने फेसबुकवर चालवलेल्या निवडणूक अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्यामुळे आता हे अभियानदेखील वादाच्या भोवऱ्य़ात सापडले आहे. हिंदुस्थानात 90 कोटी मतदार आहेत आणि त्यातील 40 कोटी फेसबुकचा वापर करतात. फेसबुकच्या व्यासपीठाचा मतदारांवर प्रभाव टाकण्यात आल्याचा आरोप आता विरोधी पक्ष आणि काही विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.
फेसबुककडे व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामचीदेखील मालकी आहे. सध्या फेसबुकची एकूणच कार्यप्रणाली बघता जगभरातीलच लोकशाही संस्थेला धक्का बसत असल्याचा आरोप विश्लेषक करायला लागले आहेत. प्रत्येक देशासाठी फेसबुकचे नियम वेगळे असून फेसबुक कायमच त्या त्या देशातील सत्ताधारी पक्षाच्या दावणीला स्वतःला बांधून घेत असल्याचे मत हे विश्लेषक व्यक्त करतात. भाजपने अर्थातच सर्व आरोपांचे जोरदार खंडन केले आहे. तथापि फेसबुक आणि वाद हे चित्र समोर आलेच.



























































