
पर्युषणकाळात मुंबईतील तीन जैन मंदिरे उद्या (दि. 22) आणि 23 ऑगस्ट असे दोन दिवसांसाठी उघडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही सवलत इतर मंदिरे खुली करण्यासाठी किंवा मोठी गर्दी होणाऱया गणेशोत्सवासाठी नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पर्युषणपर्व काळात मुंबईतील जैन मंदिरे आठ दिवस खुली ठेवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली नव्हती. राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. यावेळी मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरे 22 आणि 23 ऑगस्टला खुली ठेवण्यात याव्यात, असे सांगितले.
सशर्त परवानगी
ही परवानगी सशर्त असेल, केंद्र सरकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन व्हावे, असे सरन्यायाधीश बोबडे म्हणाले. दर्शनासाठी एकावेळी पाचजणांना परवानगी दिली जाईल. ही सवलत इतर मंदिरांसाठी नाही. गणेशोत्सवासारख्या गर्दी होणाऱया उत्सवाला परवानगी देता येणार नाही. महाराष्ट्रातील गणेशोत्सव विशेष आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. यासंदर्भात महाराष्ट्रातील आपत्कालीन यंत्रणा प्रत्येक प्रकरणात परिस्थिती पाहून निर्णय घेईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.






















































