थेट चौपाटी, तलावांमध्ये मूर्ती विसर्जन करता येणार नाही! पालिकेने पुन्हा जारी केल्या मार्गदर्शक सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, चौपाटी, तलाव अशा 70 नैसर्गिक विसर्जनस्थळांवर नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करता येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. गर्दी टाळण्यासाठी आज पुन्हा पालिकेने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, या वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे आवाहन मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱया भाविकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे, नैसर्गिक विसर्जन स्थळांवर मूर्ती पालिका कर्मचाऱयांकडे सोपवावी, ते बाप्पाचे विधिवत विसर्जन करतील, 24 विभागांमध्ये सुमारे 170 कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्यात आले आहेत.

कृत्रिम तलावांजवळ राहणाऱ्या भाविकांनी त्याचा वापर करणे बंधनकारक आहे, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करायचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलायचे आहे. सिल इमारतींमधील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरीच व्यवस्था करावयाची आहे, त्याचबरोबर गणेशोत्सवा दरम्यान मिरवणुकीला बंदी घालण्यात आली आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.