
>> आत्माराम नाटेकर
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत सुब्रमण्य भालचंद्र केळकर या मालवणमधील चिंदर गावच्या मेहनती तरुणाने अविरत प्रयत्न, पराकोटीची जिद्द, एकाग्रता आणि अभ्यास याच्या जोरावर संपादन यश केले. सुब्रमण्यला गावात सारे नीलेश म्हणून ओळखतात. सुब्रमण्य याचा अर्थ ब्राह्मणांना प्रिय किंवा कार्तिकेयचा गुणविशेष. हे कानडी नाव. सुब्रमण्यची आई कर्नाटकातील. त्याचा जन्म कर्नाटकातच झाला. त्याच्या जन्मानंतर वडील आपल्या सर्व कुटुंबकबिल्यासह चिंदर या गावी आले आणि इथेच स्थायिक झाले. भालचंद्र केळकर पौरोहित्य करून आपल्या कुटुंबाची गुजराण करू लागले. आपल्या वडिलांसोबत सुब्रमण्य पौरोहित्य करायला गावात जायचा. तो आजही गावातील लोकांना मदत करण्यासाठी शेतात जातो. त्याला शेतीची आवड आहे.
भालचंद्र आणि भूषणा या दांपत्याला दोन मुलगे. मोठा मकरंद पोलीस दलात आहे. पौरोहित्य हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने सुब्रमण्यचे वडील चिंदरच नव्हे, तर आजूबाजूच्या गावातही उन्हा-पावसात चालतच जायचे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही केळकर दांपत्याने आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अतिशय कष्ट घेतले. वेळोवेळी प्रोत्साहन दिले. सुब्रमण्य काहीसा शांत, मितभाषी आहे. संगीत, गायन, नाटक, दशावतार, खेळाबरोबरच व्यायामाचीही त्याला आवड आहे. ग्रामदैवत रामेश्वर आणि दत्ताच्या पालखीतील त्याचे सुरेल गायन साऱयांना मंत्रमुग्ध करते. श्रीआकारी ब्राह्मणदेव बाल दशावतारामध्ये त्याने केलेली नारदाची भूमिका गावकऱयांच्या स्मरणात आहे. कब़ड्डी, खो-खो, शूटिंगबॉलमध्ये त्याने प्रावीण्य मिळविले आहे. सुब्रमण्यचे प्राथमिक शिक्षण पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर नं. 1 येथे झाले. माध्यमिक शिक्षण जनता विद्यामंदिर, त्रिंबक आणि महाविद्यालयीन शिक्षण टोपीवाला कॉलेज, मालवण येथे झाले. 12 वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातून बॅचलर ऑफ बिझनेस मॅनजमेंटची डिग्री मिळविली आणि त्यानंतर मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिय़ूटय़ुशनमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. बीबीएम (ऑग्रिकल्चर), पीजी (ऑग्रिकल्चर), एमए (पॉलिटिकल सायन्स ऑपियरिंग), एनईटी ऍण्ड जेआरएफ इन पॉलिटिकल सायन्स हा त्याचा शैक्षणिक प्रवास त्याच्या गुणवत्तेची साक्ष देतो.
2014 साली सुब्रमण्य स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला, पण येथे राहण्याची सोय न झाल्याने तो गावी परत आला. त्याने जिद्द सोडली नाही. 2016 साली पुन्हा तो पुण्यात आला. या वेळी त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वसंत आपटे यांच्या वसतिगृहात राहण्यास जागा मिळाली आणि तो चाणक्य मंडल परिवारात सामील झाला. येथे त्याला अविनाश धर्माधिकारी, प्रवीण चव्हाण, विवेक कुलकर्णी या शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले. चौथ्या प्रयत्नात सुब्रमण्य ही परीक्षा उत्तीर्ण झाला. याबाबत त्याला विचारले असता तो सांगतो, ‘‘ही स्पर्धा परीक्षा आहे. केवळ प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. अनेकदा प्रयत्न करूनही यश मिळत नाही. या वर्षी माझी निवड झाल्याने मी निश्चितच आनंदी आहे. पण माझ्यापेक्षा जास्त हुशार आणि अधिक मेहनत घेणाऱया माझ्या अनेक मित्रांची निवड होऊ शकली नाही, याचीही मला रुखरुख आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना खचून न जाता पुन्हा एकदा सर्वतोपरी प्रयत्न करावयास हवेत. माझ्या या यशात माझे आईवडील, मोठा भाऊ, सहकारी, मित्र, ग्रामस्थ आणि माझ्या चिंदर गावच्या दैवतांचा आशीर्वाद यांचा फार मोठा वाटा आहे. देशाचे संविधान, कायदे आणि मानवी समाजमूल्ये यांचा मी सदोदित आदर करत आलो आहे.’’
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द बाळगणाऱया या तरुणाचा आता प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठी मातृभाषेतून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱया सुब्रमण्यने देशातून 497 वा रँक मिळविला आहे. या रँकवरून त्याला निश्चितच आयपीएस किंवा आयआरएस केडर मिळण्याची शक्यता आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कठोर मेहनतीने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन सुब्रमण्यने आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
























































