भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहीरीत पडला; संगमेश्वरातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली पाष्टेवाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी रात्री घडली. बिबट्या विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी आंबवली पाष्टेवाडीमध्ये दाखल झाले. एक तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात वन विभागाला यश आले.

विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने ही कामगिरी केली. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या मोहिमेत ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे वनविभागाने सांगितले. पाच वर्षांचा नर बिबट्या असल्याची माहितीही वनविभागाने दिली. यावेळी परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड , वनपाल सुरेश उपरे , वनरक्षक नानू गावडे , मिलींद डाफळे , शर्वरी कदम आदी यावेळी उपस्थित होते.