
चीन आणि हिंदुस्थानमध्ये लडाख सीमारेषेवरून तणाव आहे. तसेच चीनचा तैवानसोबतही संघर्ष सुरू आहे. चीनने विस्तारवादी भूमिका राबवत नेपाळच्या सात जिल्ह्यातील भूभाग हडपला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया बेटावर तीन बी 2 स्टेल्थ बॉम्बवाहक आणि बॉम्बवर्षक विमाने तैनात केली आहे. ही विमाने अण्वस्त्र वाहण्यासही सक्षम आहेत. हिंदी महासागरात ही विमाने तैनात करून अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे. चीनने कोणत्याही देशावर दबाव टाकू नये, तसेच युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू नये, असे संकेत अमेरिकेने चीनला दिले आहेत.
या विमानांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रडारच्या कक्षेत येत नाहीत. ही विमाने 12 ऑगस्टला डिएगो गार्सिया बेटावर पोहचली होती, अशी माहिती मिळाली आहे. हे बेट यूएस इंडो-पॅसिफिक कमांडतंर्गत येते. या बेटावर ही विमाने तैनात करून अमेरिकेने चीनला इशारा दिला आहे. हिंदी महासाहर, दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. चीनची आक्रमकता वाढत असल्याने अमेरिकेने ही विमाने हिंदी महासगारात तैनात केली आहेत.




























































