सोयाबीनवर पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव; पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तुळजापुर तालुक्यात सोयाबीनसह मुग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा चांगल्या आलेल्या सोयाबीनवर पाने कुरतडणाऱ्या अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांना गळती लागली आहे. त्याचबरोबर पानेही पिवळी पडली आहेत. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

यावर्षी सोयाबीनसह मूग, उडीद ही खरीपातील पिके चांगली आली होती. त्यामुळे शेतकरी आनंदात होता. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतात बहरलेल्या या पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी सोयाबीन, मूग आणि उडदाचे पीक चांगले आले होते. पेरणी झाल्यानंतर पिकाच्या वाढीसाठी लागणारा पाऊस वारंवार पडत गेला. त्यामुळे या पिकांची चांगल्याप्रकारे वाढ झाली होती. सोयाबीन तर सध्या कमरेपर्यंत आले आहे. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे सोयाबीनवर पाने कुरताडणाऱ्या अळीसह विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी सध्या महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. सोयाबीनची ही अवस्था तर मुग व उडीद पिकेही अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात कुजुन जात आहे. संततधार पावसामुळे या पिकांना उन्हच मिळाले नाही, याचा परिणाम पिकांवर होऊन चांगली आलेली पिके अडचणीत आली आहेत

सोयाबीनची अवस्था सध्या शेंगांमध्ये दाणे भरण्याची होती. मात्र, या पावसामुळे शेंगांमध्ये दाणे कसे भरणार अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. त्याचा मोठा परीणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर कायम संकटच आहे. संकटावर मात करीत शेतकरी उभा राहत असताना आता नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीनसह मुग व उडदाचेही मोठे नुकसान झाले आहे. मुग तर काढणीला आले होते, मात्र, या पावसामुळे मुगाचेही नुकसान झाले आहे. मुगाच्या शेंगांमधून मोड बाहेर आले आहेत तर अनेक ठिकाणी मुगाचे उभे पीक आडवे झाल्याने पाण्यात कुजून गेले आहे. तालुक्यातील नळदुर्गसह ग्रामीण भागातील पिकांचे या संततधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.