
पुणे शहरातील काही भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसह नागरिकांना लक्ष्य करुन दागिन्यांसह मोबाईल हिसकाविले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाजी रस्त्याने पायी चाललेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा मोबाईल हिसकाविला आहे. त्यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकाश जयकुमार बुरले (वय 58) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. त्यांनी खडक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.
प्रकाश सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून स्वारगेट पोलीस लाईनला राहायला आहेत. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते शिवाजी रोडने पायी निघाले होते. त्यावेळी घनश्याम लॉजजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळील मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रकाश यांनी चोरट्यांना प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर दोघे चोरटे पसार झाले. प्रकाश यांनी खडक पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात तब्बल 7 हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. मात्र, ऐन वर्दळीच्या शिवाजी रस्त्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करेपर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
























































