
रोइंग या खेळाला मुंबई-महाराष्ट्रासह हिंदुस्थानात महत्त्व प्राप्त करून देणार्या दत्तू भोकनळ या मराठमोळ्या खेळाडूची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी दैनिक ‘सामना’ने त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, अर्जुन पुरस्कार मिळाल्याची भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आनंद गगनात मावेनासा झालाय, पण मिशन अजून सुरूच आहे. ते संपलेले नाही. आता हिंदुस्थानचा झेंडा ऑलिम्पिकसह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मेडल्स जिंकून दिमाखात फडकवायचाय. पुढील लक्ष्य टोकियो ऑलिम्पिक असून यासाठीच प्रयत्न सुरू आहेत, कसून सराव केला जात आहे असे उद्गारही त्याने पुढे काढले.
कष्टाचे चीज झाले
माझी अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ही बातमी मला ऑनलाइनच समजली. आई तुळजाभवानी व आईवडिलांचा आशीर्वाद असल्यामुळे मला इथपर्यंत मजल मारता आली. इतकी वर्षे मेहनत केल्याचे फळ मिळाले, कष्टाचे चीज झाले असे भावुक उद्गार दत्तू भोकनळ याने यावेळी काढले.
पाच आंतरराष्ट्रीय पदकांवर मोहोर
वयाच्या 21व्या वर्षी आर्मीमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर रोइंग या खेळामध्ये पाऊल टाकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालो. पाच आंतरराष्ट्रीय पदकेही पटकावली. यूएस चॅम्पियनशिप, आशियाई स्पर्धा व इनडोअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण तर आशियाई चॅम्पियनशिप व ऑलिम्पिक पात्रता फेरीत रौप्य पदक जिंकले, असे दत्तू भोकनळ याने यावेळी सांगितले.
रिओनंतर खेळाचा प्रचार–प्रसार होऊ लागलाय
रिओ ऑलिम्पिकमध्ये माझ्याकडून चांगली कामगिरी झाली. त्यानंतर रोइंग हा खेळ हिंदुस्थानात ओळखला जाऊ लागला. आता पूर्वीसारखी परिाqस्थती राहिलेली नाही. गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये रोइंग या खेळामध्ये ‘ग्रोथ’ होताना दिसत आहे. या खेळामध्ये भविष्यात असंख्य खेळाडू करीअर घडवताना दिसू शकतील असे दत्तू भोकनळला वाटते.
शेती करून फिटनेस राखला
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्यामुळे दत्तू भोकनळला नाशिक येथील घरीच राहावे लागले. रोइंग या खेळाच्या सरावासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते, पण तालुका तांदवड व गाव तळेगाव येथे राहत असलेल्या दत्तू भोकनळ याला तिथे पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्याने आपला फिटनेस राखण्यासाठी शेती केली. बाजरीची पेरणी, मक्याची लावणी व मिरचीची लागवड या गोष्टी त्याने केल्या व फिटनेसवरही ध्यान दिले.
युवा खेळाडूंना संधी
रोइंग हा खेळ महागडा आहे हे मान्य आहे, पण हिंदुस्थानात महाराष्ट्र, केरळ, नाशिक यांसारख्या ठिकाणी उत्तम ऑकॅडमी व सुविधा उपलब्ध आहेत. ज्या युवा खेळाडूंना या खेळामध्ये करीअर करायचे आहे, त्यांना अशा ऑकॅडमीमध्ये जाऊन सराव करता येऊ शकतो. तसेच प्रशिक्षक व डाएट यांचा खर्च तर इतर खेळांमध्येही खेळाडूंना करावाच लागतो. रोइंग हा खेळही वेगळा नाही असे स्पष्टीकरण पुढे दत्तू भोकनळ याने यावेळी दिले.

























































