
हिंदुस्थान आणि चीन यांच्यात सीमेरेषवर तणावाचे वातावरण कायम असताना चीनकडून लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर कुरापती काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. एलएसीवर चीनकडून 5 जीच्या बांधकाम सुरुवात केली आहे. इतकेच नक्हे तर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीतर्फे पैगॉन्ग सो झील येथे सैन्य दलासाठी छावणीच्या बांधकाम सुरु करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनकडून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एलएसीवरील डेमचोक येथील विवादित भागांवर 5जीसाठी कामकाज सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून चीनच्या एलएसीवर फायबर ऑप्टिकल केबल बसविण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे चीनने सैन्य मागे घेतल्याचा दावा देखील आता फोल ठरला आहे. चीनच्या पैगॉन्ग सो झील येथे देखील छावणीचे कामकाजास सुरुवात झाल्याचे कळते. याठिकाणी सध्या शेड बांधण्याचे काम केग घेत आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले तर चीनच्या 35 जवानांचा मृत्यू झाला होता. मात्र चीनने त्याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
चार महिन्यानंतरही तणाव कायम
हिंदुस्थान आणि चीनमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून सीमा रेषेवर तणाव कायम असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला गलवान खोऱ्यात चीनने कुरापती केल्या. त्यानंतर याठिकाणी सैन्य मागे घेतल्याचा दावा केला होता. आता चीनचे सैन्य दल पैगॉन्ग आणि गोगरा हॉट प्रिग याठिकाणी आपले तळ ठोकून असून याठिकाणी आपले वर्चस्व कायम ठेवायला बघत आहेत.



























































