
> मीरा जोशी, अभिनेत्री
अनलॉकनंतर ऑगस्टपासून पुन्हा एकदा नव्या एनर्जीने घराबाहेर पडून मी कामाला सुरुवात केलीय. मोठ्या ब्रेकनंतर शुटिंगला जाण्याची खूप ओढ होती. मुंबईत ‘मॅडम सर’ ही मालिका त्यानंतर फलटणला जाऊन एका गाण्याचे शूट केलं. नुकतच एका वेबसिरीजसाठी पायलट शूट केलंय. काही ऑडिशन देतेय. दोन चित्रपट आणि पाच ते सहा गाण्यांचे लॉकडाऊनपूर्वीच मी शूटिंग केलंय. या वर्षीच्या शेवटी ते प्रेक्षकांच्या भेटीला येतील, अशी आशा आहे. एकंदरीत पुन्हा सगळं हळूहळू सुरू होतंय. कोरोनाच्या काळात नागरिक आता सुज्ञ झाले आहेत. आपली आणि इतरांची काळजी कशी घ्यायची हे आता प्रत्येकाला समजलेय. यापुढे देखील अशीच एकमेकांची काळजी घेतली, छान आनंदी आणि सकारात्मक राहिलो तर लवकरच कोरोना दूर पळून जाईल. हल्ली आपल्या सगळ्यांना फास्ट लाईफची सवय झालीय. सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तेव्हा चुटकीसरशी उपलब्ध होतात. मनात आलं तेव्हा आपण शॉपिंगला जाऊ शकतो, मनात आलं तेव्हा बाहेर फिरू शकतो. लॉकडाऊनमुळं घरातच बसून राहणं सुरुवातीला कठीण गेलं. त्यामुळं काहीशी चिडचिड त्यावेळी झाली होती.
गेल्या आठ वर्षांपासून मी कामानिमित्त मुंबईत एकटीच असते. आईबाबा पुण्यात असतात. योगायोगाने लॉकडाऊनमध्ये माझ्यासोबत आई असल्यानं बर्या च वर्षांनी तिच्यासोबत छान वेळ घालवला. सुरुवातीपासूनच आमच्यात खूप छान बॉण्डिंग होतं. या दरम्यान ते आणखी घट्ट झालं. अनेक राहून गेलेल्या गोष्टी या दरम्यान केल्या. चांगले सिनेमे – वेबसिरीज पहिल्या. पुस्तकं वाचली. जेवण बनवणं यापूर्वी मला फारस जमायचं नाही. आता पोळीभाजी, आमटी, भात या जेवणातल्या बेसिक गोष्टी शिकले. सोशल मीडियावरून चाहत्यांशी कनेक्ट होते.
माझ्या जुन्या परफॉर्मन्सच्या काही सीडी साफसफाईदरम्यान मिळाल्या. त्या सिडीजपासून बेडरूममध्ये ‘वॉल ऑफ मेमरीज’ तयार केली. घरातल्या फर्निचरची जागा बदलली. लॉकडाऊनदरम्यान अनेकांचं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू होतं तसचं माझंही ‘शूट फ्रॉम होम’ सुरू होतं. काही लघुपटांसाठी मी घरातूनच शूटिंग केलं. डान्स हादेखील उत्तम व्यायाम आहे त्यामुळं मी वर्कआऊट करायचे नाही. या दरम्यान मात्र ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंग घेतलं.
कोरोनाच्या या संकटात पेशन्स ठेवणं आणि नव्या गोष्टींशी जुळवून घेणं हे मी शिकले. आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टीदेखील खूप काही शिकवत होत्या. आमच्या बिल्डिंगखाली पाणीपुरी विकणारे दादा होते. लॉकडाऊन झाल्यानंतर लगेच त्यांनी पाणीपुरीचा धंदा बंद करून केळी विकायला सुरुवात केली. आयुष्यात प्लॅन ए वर्क झाला नाहीतर प्लॅन बी रेडी ठेवणे यातून मी शिकले. लॉकडाऊनमध्ये मनोरंजनसृष्टी पूर्णपणे बंद होती. अशावेळी भविष्याच्या दृष्टीने मीदेखील प्लॅन बीचा विचार केला.




























































