आभाळमाया – दूरदूरचे ग्रह…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

मंगळ, गुरू आणि सूर्यमालेतील इतर ‘मंडळीं’विषयी आपण अनेकदा वाचतो, बोलतो; परंतु युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो यांच्याबाबत फारशी माहिती अभ्यासक वगळता बाकीच्यांना बेताचीच असते. खूप दूर अंतरावरच्या या ग्रहगोलकांची गणना आपल्याच सौर कुटुंबात होते. वस्ती करण्यासाठीची स्वप्नं आपण मंगळापर्यंतच पाहू शकतो. त्यापुढच्या ग्रहांच्या संदर्भात हे केवळ अशक्यच.

आपल्या प्राचीन ‘ग्रह’ संकल्पनेत ‘नवग्रह’ होते. त्यात सूर्य, चंद्र आणि राहू-केतूचा समावेश होता. पृथ्वी या आपल्या ग्रहाचा नव्हता. आधुनिक विज्ञानानेही 2004 पर्यंत नवग्रहांच्याच सौर कुटुंबाची मांडणी स्वीकारली, परंतु त्यात सूर्य हा जनक तारा आणि बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो असे ‘नवग्रह’ होते. मात्र 1930 पासूनच प्लुटोच्या ग्रहपदाबद्दल वाद होता. शेवटी त्याची ‘खुजा’ ग्रहात नोंद झाली आणि आपली सूर्यमालेची अष्टग्रही अस्तित्वात राहिली.

यापैकी आता शेवटचा ग्रह आहे नेपच्यून. त्याआधी युरेनस हे प्रचंड आकाराचे ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती विशाल देहाचे आहेत हे लेखातील फोटोवरून लक्षात येईल. नेपच्यूनपलीकडला प्लुटो तर ठिपक्यासारखाच दिसतोय.

या दूर अंतरावरच्या ग्रहांची माहिती 1980मध्ये ‘व्हाएजर-2’ हे यान त्यांच्याजवळून गेलं तेव्हा मोठय़ा प्रमाणात प्राप्त झाली.
शनीप्रमाणेच युरेनसलाही बारीकसं ‘कडं’ आहे. त्यात असंख्य दगड-गोटे सामावलेत. युरेनसचं सूर्यापासूनचं अंतर आहे पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या सुमारे वीस पट. पृथ्वी-सूर्य अंतर 15 कोटी कि.मी. हे लक्षात घेतलं तर युरेनस सूर्यापासून किती लांब आहे याचा अंदाज येऊ शकेल. चार पृथ्वी होतील एवढा त्याचा व्यास आहे. म्हणजे सुमारे 52 हजार किलोमीटर. युरेनसचा दिवस पृथ्वीच्या तुलनेत केवळ 17 तासांचा आहे. त्याला सूर्याभोवती एक फेरी मारायला 84 वर्षे लागतात. आपल्या पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशांनी कललेला आहे आणि त्यामुळे आपण ऋतुचक्र अनुभवू शकतो. युरेनसचा अंश जवळजवळ नव्वद अंशांनी कललेला असल्याने तो सूर्याभोवती ‘गडगडत’ फिरल्यासारखा क्रमण करतो. युरेनसवरून अवकाशयान उडवायचं तर त्याला सेकंदाला 21 किलोमीटर एवढा वेग (एस्केप वेलॉसिटी) धारण करावा लागेल.

अठराव्या शतकापर्यंत आधुनिक खगोलशास्त्राला सहाच ग्रह ठाऊक होते. 13 मार्च 1781 ची रात्र मात्र सौरमंडलात क्रांतिकारक शोध लावणारी ठरली. विल्यम हर्बल या खगोल अभ्यासकाने शनीपलीकडे एक अस्पष्ट ग्रह शोधला.

या संशोधनामुळे सूर्यमंडळाचा विस्तार एका क्षणात दुपटीने वाढला. तोपर्यंतची ग्रहमाला पृथ्वी व सूर्य अंतराच्या नऊपट होती ती एकदम एकोणीस पट अंतराची झाली. हर्बलने त्या ग्रहाला तिसऱया जॉर्ज राजाच्या नावावरून ‘जॉर्जियन प्लॅनेट’ असं नाव दिलं. नंतर ते बदलून युरेनस म्हणजे स्वर्गाचं प्रतीक असं ग्रीक संकल्पनेचं नाव मिळालं. अर्थात हर्बलच्या आधीही अनेक अभ्यासकांनी 1690 पासून युरेनसची निरीक्षणे केली होती.

युरेनसच्या भ्रमणाची संथ गती अभ्यासताना न्यूटनच्या पद्धतीनुसार त्याच्या गतीचा अंदाज येत नसल्याचं अभ्यासकांच्या लक्षात आलं. त्यामुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम युरेनसइतक्या दूर अंतरावरच्या ग्रहावर होत नसावा अशीही चर्चा होऊ लागली. मात्र 1840 मध्ये फ्रेंच खगोल अभ्यासक अबॅन वेरिएट आणि ब्रिटिश अभ्यासक जॉन ऍडम्स यांनी स्वतंत्रपणे असा निष्कर्ष काढला की, युरेनसच्या अपेक्षित गतीमध्ये बाधा येण्याचं कारण म्हणजे, त्यापलीकडे कोणता तरी ग्रह असावा. 1613 मध्ये खुद्द गॅलिलिओ यांनाही गुरूच्या ‘चंद्रा’चं दुर्बिणीतून निरीक्षण करताना नेपच्यूनच्या अस्तित्वाची चाहूल लागली होती, परंतु त्यावेळच्या मर्यादित संशोधनातून निष्कर्ष काढणं कठीण होतं. शेवटी 23 सप्टेंबर 1846 च्या रात्री गेल आणि हेलरिच यांना नेपच्युनचा ठावठिकाणा समजला. युरेनसप्रमाणेच नेपच्युनचं दर्शनही व्हॉएजर-2 ने 1986 मध्ये प्रथमच घेतलं.

त्यामध्ये नेपच्युनचं ढगाळ वातावरण आढळलं. या ग्रहाचं पृथ्वीपासूनचं अंतर तर सूर्य-पृथ्वी अंतराच्या 30 पट आहे. त्याचा अक्ष किंचित कललेला आहे. तो स्वतःभोवती 19 तासांत तर सूर्याभोवती 165 वर्षांत एक फेरी पूर्ण करतो. त्याचा व्यास 49 हजार किलोमीटर इतका असून त्यावरून अवकाशात उड्डाण करायचं तर सेकंदाला 23 किलोमीटर वेग असणं गरजेचं आहे. (पृथ्वीवरून रॉकेट अवकाशात झेपावतं तेव्हा सेकंदाला 11 कि.मी. इतका वेग असतो.)

गुरूपासून पुढच्या ग्रहांना ‘जोनियन प्लॅनेटस्’ असं म्हटलं जातं. नेपच्युननंतरचा प्लुटो आता ‘खुजा’ झाल्याने येथे आपली ग्रहमाला संपते. मात्र प्लुटोपलीकडे लघुग्रहांचा तो पट्टा आहे त्याला ‘किपट बेल्ट’ असं म्हटलं जातं. युरेनसप्रमाणेच नेपच्युनभोवतीही लघुग्रहांचं कडं आहे. असे हे आपले सौर कुटुंब, अनेक विस्मयांनी भरलेलं आढळतं.