
मुंबईत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असताना आता मलेरियाने डोके वर काढले आहे. ऑगस्ट महिन्यातच मलेरियाचे 1,137 रुग्ण आढळले असून आतापर्यंत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहावे, घरात आणि घराबाहेर पाणी साचू देऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मलेरिया, डेंग्यू, कावीळ, अतिसार, एच-2, एन -1 हे साथीचे आजार पावसाळ्यात पसरतात. जून, जुलै कोरडे गेल्यानंतर मात्र पावसाने ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आता साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे 824 रुग्ण आढळले होते. मात्र या वर्षी ऑगस्ट महिन्यात 1,137 रुग्ण आढळले असून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.
मलेरियाच्या चाचण्यांत वाढ
मलेरियाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून रुग्णालय, दवाखाने आणि हेल्थ पोस्टवर चाचण्यांमध्ये वाढ केली आहे. मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण शोधण्यासाठी पालिकेकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्याबरोबरच धूरफवारणी करण्यात येत आहे. दादर, माहीम आणि धारावीत मलेरियाविरोधात विशेष मोहीम राबवली गेली. बांधकामाच्या ठिकाणी मलेरियाचे रुग्ण अधिक सापडत असल्यामुळे अशा ठिकाणीही मलेरियाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे लेप्टोला आळा घालण्यासाठी आतापर्यंत 6 लाख 71 हजार 663 घरांमधील 25 लाख 83 हजार 239 रहिवाशांची तपासणी केली आहे. 35 हजार 21 ज्येष्ठ तर 829 लहान मुलांना औषधांचे वाटप करण्यात आले आहे.
साथीचे आजार वर्ष 2019 वर्ष 2020
मलेरिया 824 1,137
लेप्टो 49 45
गॅस्ट्रो 623 53
कावीळ 147 10
डेंग्यू 134 10




























































