पालिका चिटणीस पदावरून पेच, दोघा अधिकाऱ्यांच्या दावेदारीमुळे नियुक्ती लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबई महापालिका चिटणीस पदासाठी मराठी-इंग्रजी विभागातून एकाच वेळी आलेल्या दोघा उपचिटणीस पदावरील अधिकाऱयांच्या दावेदारीमुळे पालिका मुख्यालयातील महापालिका चिटणीसाची (सेक्रेटरी) नियुक्ती लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता कोणाची ग्राह्य धरून कोणाची चिटणीस पदावर नियुक्ती करायची, असा पेच सामान्य प्रशासन विभागासमोर उभा राहिला आहे.

मुंबईत कोरोनाची लागण झाल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. या दरम्यान, महापालिका चिटणीस कार्यालयाचे प्रमुख प्रकाश जेकटे हे निवृत्त झाले. त्यांच्या जागी विनीत चव्हाण यांची नियुक्ती झाली. मात्र, त्याही 31 ऑगस्टला सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका चिटणीस पदासाठी मराठी विभागातून उपचिटणीस शुभांगी सावंत तर इंग्रजी विभागातून उपचिटणीस संगीता शर्मा यांनी दावेदारी केली आहे. शुभांगी सावंत यांना 1 जून 2018 मध्ये तर संगीता शर्मा यांना 1 नोव्हेंबर 2018मध्ये उपचिटणीस पदावर बढती मिळाली. शुभांगी सावंत यांना शर्मा यांच्या पाच महिने आधीच बढती मिळाली आहे. मात्र, तरीही शर्मा यांनी चिटणीस पदावर दावा केला आहे.

चिटणीस कार्यालयात मराठी आणि इंग्रजी असे दोन विभाग आहेत. मराठी विभागातून शुभांगी सावंत या ज्येष्ठ आहेत तर इंग्रजीतून संगीता शर्मा या ज्येष्ठ आहेत. त्यामुळे दोघांचीही ‘कॉमन सिनिऑरिटी’ आहे. त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. पण त्यावर तोडगा काढून याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ.’
– मिलीन सावंत, महापालिका सहआयुक्त (सामान्य प्रशासन)