जगात हिंदुस्थानने मारली बाजी, कोरोनाला हरवण्यासाठी साडेचार कोटी चाचण्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जगाची दमछाक करणाऱया कोरोनाला हरवण्यासाठी हिंदुस्थानने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. संसर्गाचे वेळीच निदान करण्यासाठी देशात आतापर्यंत तब्बल 4 कोटी 55 लाख 9 हजार 380 चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी एका दिवसात 11 लाख 72 हजार 179 नमुने तपासण्याचा विक्रम करण्यात आला. देशातील कोरोना चाचण्यांचे नियमित प्रमाण जगात सर्वाधिक आहे, असा दावा गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने केला.

देशात 30 जानेवारीला दररोज 10 चाचण्यांची सुरुवात करण्यात आली होती. संसर्गाचे वेळीच निदान झाल्याने कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवू शकत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळेच कोरोनाचा मृत्यूदर 1.75 टक्क्यांवर खाली आला आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.09 टक्क्यांवर सुधारले आहे. एकूण कोरोनाग्रस्तांपैकी केवळ 21.16 टक्के इतकेच रुग्ण ऑक्टिव्ह आहेत. कोविड प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेच मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करण्यात यश आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात सरकारी 1022 आणि खासगी 601 अशा एकूण 1623 प्रयोगशाळा आहेत.