
दहावी, बारावीनंतरच्या शिक्षणासाठी यंदा आयटीआय बेस्ट पर्याय ठरले आहे. राज्यातील खाजगी आणि शासकीय आयटीआय प्रवेशासाठी यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. आयटीआय प्रवेशासाठी राज्यभरातून तब्बल 2 लाख 97 हजार 792 अर्ज आले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा अर्जांमध्ये साडे नऊ हजारांनी वाढ झाली आहे.
राज्यातील खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 84 व्यवसाय अभ्यासक्रमांच्या 6 हजार 868 तुकडयांमधून 1 लाख 45 हजार 632 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी राज्यभरातून तब्बल 3 लाख 24 हजार 863 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 2 लाख 97 हजार 792 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निश्चित केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशाचे अर्ज निश्चित करण्याऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 1 लाख 41 हजार 224 जागांसाठी 2 लाख 88 हजार 221 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले हाते. त्यामध्ये यंदा तब्बल 9 हजार 571 अर्ज अधिक आले आहेत. इलेक्ट्रिशन, फिटर, मशिनिस्ट, डिझूल, मोटर मेकॅनिक मशिनिस्ट या अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देतात. 90 पेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थीही आयटीआयला पसंती देतात. आयटीआय प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी 5 सप्टेंबरला जाहीर होणार आहे.
वर्ष जागा अर्ज
2019 1,41,224 2,88,221
2020 1,45,632 2,97,792
























































