
ऑनलाईन जगात अनेक अॅप्लिकेशन आपल्याला भुरळ पाडत असतात. त्यातील अनेक अॅप्स हे सोयीचे असतात म्हणून आपण डाऊनलोड करतो. पण, या अॅप्लिकेशनमधून तुमच्या फोनमध्ये व्हायरस शिरू शकतो. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरने असे सहा अॅप्स बंद केले आहेत.
हे अॅप्लिकेशन युजरच्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर या अॅपमधील व्हायरस तुमच्या खासगी डेटामध्ये शिरून तो लीक करू शकतो. किंवा तुमच्या फोनमधील इतर अॅप्स करप्ट करू शकतो. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरने या अॅप्सना शोधून त्यांना हटवून टाकलं आहे. मात्र, हे अॅप्स आधीच कुणी डाऊनलोड केले असतील तर ते फोनमधून हटवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कारण यातील बहुतेक अॅप्सना जवळपास दोन लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केल्याचा अधिकृत डेटा गुगलला प्राप्त झाला आहे.
कोणते आहेत हे अॅप्स-
या सहा अॅप्सपैकी पहिलं अॅप आहे कन्विनियंट स्कॅनर. हे अॅप तुमचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून ती व्हर्चुअल म्हणजे सॉफ्ट कॉपी स्वरूपात उपलब्ध करून देतं. त्याखेरीज सेपरेट डॉक स्कॅनर नावाचं अॅपही एक स्कॅनर अॅप आहे. त्यानंतर सेफ्टी अॅपलॉक हे अॅप फोनमधील एखाद्या अॅपला किंवा इमेज, डॉक्युमेंट यांच्या फोल्डरला लॉक करण्याचं काम करतं. त्यानंतर पुश मेसेज टेक्स्टिंग अँड एसएमएस हे अॅप्लिकेशन मेसेंजरप्रमाणे काम करतं. त्यात मेसेज पाठवण्यापासून ते मेसेज स्केड्युल करून विशिष्ट वेळी पाठवण्याचीही सोय आहे. इमोजी वॉलपेपर नावाचं अॅप फोनची बॅकग्राऊंड इमेज बदलण्यासाठी किंवा थीम निवडण्यासाठी वापरलं जातं. ही सहा अॅप्स तुमच्याकडे असतील तर ती ताबडतोब डीलिट करा, असा सल्ला गुगल प्लेस्टोअरने दिला आहे.


























































