
मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली कृष्णनगरीसमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन मोटरसायकलची धड़क होऊन शनिवारी दुपारी 2 वाजता अपघात झाला. मृतांमध्ये रत्नागिरी पाचलमधील एकजण व कोल्हापूरमधील दोघांचा समावेश आहे. सात्तापा शिवाजी पाटील( 26),अजय हिंदुराव पाटील (20,दोन्ही रा.आदमापूर, भुदरगड, कोल्हापूर),अस्लम कासम कल्लोट( 23,रा.पाचल, राजापूर, रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत. आश्रफ प्रफुल्लकर ( वय 35, रा. पाचल, राजापूर, रत्नागिरी) हे अपघातात गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात झाल्यानंतर दुचाकीवरील चौघेजण फेकले गेले होते. त्यातील तिघांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या एकावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम यांच्यासह कणकवली पोलीस दाखल झाले होते.


























































