उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विधिमंडळ सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार 7 सप्टेंबर आणि मंगळवारी 8 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी विधिमंडळ सज्ज झाले असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी पार पाडली जात आहे. जंतूसंसर्ग टाळण्यासाठी दोन्ही सभागृहांत यूव्ही लाइट, आसन व्यवस्थेचे सरफेस कोटिंग, ओझोन जनरेटर बसविण्यात येत असून सोशल डिस्टन्सिंग कटाक्षाने पाळले जाणार आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारला अधिवेशन दोन वेळा पुढे ढकलावे लागले होते. राज्यात करोनाचे संकट गंभीर बनल्याने पावसाळी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे होणार असून अधिवेशनादरम्यान होणारी गर्दी टाळण्यात येणार आहे. यासाठी अधिवेशनाच्या दोन दिवसआधी कोरोना चाचणी केलेल्यांनाच विधानभवनात प्रवेश देण्यात येणार आहे. आमदार, कर्मचारी, पोलीस तसेच पत्रकारांनाही कोरोना चाचणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे विधिमंडळातील गर्दीला आळा बसणार आहे. एप्रिलपासून तब्बल सहा वेळा संपूर्ण विधान भवन सॅनिटाइज केले असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका जितकी काळजी घेता येईल तितकी घेण्यात आली असल्याचे विधिमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्य़ांकडून सांगण्यात आले.

जंतूसंसर्ग रोखणार

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जंतूसंसर्ग रोखण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सभागृहांत यूव्ही लाइट बसविण्यात येत आहेत. त्यचाप्रमाणे ज्या ठिकाणी सदस्य बसणार तेथील आसन व्यवस्थेला सरफेस कोटिंग करण्यात येणार आहे. याठिकाणी सदस्य शिंकला, खोकला किंवा हातांचा स्पर्श केला तरी जंतूंचा या कोटिंगमुळे नाश होणार आहे. त्याचप्रमाणे यूव्ही लाइटमुळे जंतूंचा नाश तर होणार आहेच शिवाय शुद्ध आणि जंतुमुक्त हवेसाठी ओझोन जनरेटरही सभागृहात बसविण्यात येत आहेत.

आमदारांसाठी सेफ्टी किट

आमदारांना सभागृहात प्रवेश करण्याआधी सेफ्टी किट देण्यात येणार आहे. यामध्ये फेस शिल्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हजही पुरविण्यात येणार आहेत.

चहापानाचा कार्यक्रम रद्द, अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडणार

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्य़ा चहापानाची परंपरा कोरोना प्रादुर्भावामुळे खंडित झाली आहे. चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.  अधिवेशनाचे कामकाज आटोपशीर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास, लक्षवेधी सूचना  होणार नाहीत. अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि शासकीय विधेयके  मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत. 7 सप्टेंबरला पहिल्या दिवशी अध्यादेश पटलावर ठेवण्यात येतील. तसेच सन 2020-21 या वर्षाच्या पुरवणी मागण्या आणि 11 शासकीय विधेयके सादर करण्यात येतील. याशिवाय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, माजी विधानसभा सदस्य अनिल राठोड, सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामरतन राऊत, चांद्रकांता गोयल आदींच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

228 आमदार सभागृहात, उर्वरित प्रेक्षक गॅलरीत

सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केवळ 228 आमदारांनाच सभागृहात बसता येणार आहे. उर्वरित 60 आमदारांना प्रेक्षक तसेच विद्यार्थी गॅलरीत बसविण्यात येणार आहे. या ठिकाणी माइक तसेच हेडफोनची सुविधाही करण्यात आली आहे.

कोरोना चाचणीसाठी झुंबड

चाचणीशिवाय एण्ट्रीच मिळणार नसल्याने कर्मचारी आणि पोलिसांनी कोरोना चाचणीसाठी विधिमंडळ आवारात एकच झुंबड केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळताना विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्थेची अक्षरश: दमछाक झाली.