
विस्तारवादी चीनने आता जगभरातील कोरोना लसींच्या शोधात अडसर निर्माण होईल अशी कृती केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खलनायकी भूमिका साकारत चीनने अमेरिकेला केली जाणारी माकडांची निर्यातच बंद केली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या चाचण्या घेणे कठीण झाले आहे.
अमेरिकेने औषधे आणि लसींच्या चाचण्यांसाठी गेल्या वर्षी 35 हजार माकडे चीनकडून आयात केली होती. पण आता अमेरिकेशी संबंध बिघडल्याने आणि स्वतःच चीनला कोरोना लसींच्या चाचण्यांसाठी माकडांची गरज असल्याने यंदा माकडांची निर्यात पूर्ण थांबवली आहे. त्यामुळेच अमेरिकेची कोरोना लस चाचणी अडचणीत आली आहे. अमेरिकन माकडांच्या तुलनेत आशियाई माकडे वैद्यकीय चाचण्यांसाठी अतिशय योग्य ठरतात, त्यामुळे चीनमधील माकडांना अमेरिकेतून मोठी मागणी आहे. शिवाय आता कोरोना संक्रमणामुळे ही मागणी अधिकच वाढली आहे. माकडांच्या तुटवड्यामुळे आता अमेरिकेतही ‘मंकी रिझर्व्ह’ माकडांचे अभयारण्य उभारण्याची मागणी जोरात होऊ लागली आहे.
लसींच्या चाचणीसाठी माकडेच का?
कोणत्याही लसीचा मानवावर प्रयोग करण्यापूर्वी ती लस माकडांना टोचली जाते. कारण माणूस आणि माकड यांची इम्यून सिस्टीम जवळजवळ सारखीच असते.या स्थितीत लस टोचल्यावर अँटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया दोघांत सारखीच असते. त्यामुळे नव्या लसीचे मानवी शरीरावर होऊ शकणारे परिणाम संशोधकांना ओळखता येऊ शकतात. असे युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे लस संशोधक जे. फ्लीन यांचे म्हणणे आहे. कोरोना संक्रमणाचा माकडांवर अत्यल्प असा परिणाम होतो.त्यामुळे माकडाचा लसींच्या चाचणीसाठी योग्य माध्यम ठरते असेही फ्लीन यांनी स्पष्ट केले.



























































