
बॅडमिंटन या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत मुंबई, महाराष्ट्रासह हिंदुस्थानचा झेंडा दिमाखात फडकवणाऱया चिराग शेट्टी या खेळाडूला 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. याच निमित्ताने रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सकडून या मुंबईकर पठ्ठय़ाचा सन्मान करण्यात आला.
मालाड येथील रायन इंटरनॅशनल स्कूल (आयसीएसई) या शाळेमध्ये चिराग शेट्टी याने शालेय शिक्षण पूर्ण केले. याच पार्श्वभूमीवर या शाळेकडून सोहळ्याचे आयोजन करून त्याचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. ए. एफ. पिंटो व संचालक डॉ. स्नेहल पिंटो या मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. ए. एफ. पिंटो म्हणाले, चिरागने आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल केले याचा आम्हाला अभिमान आहे. यापुढेही त्याने बॅडमिंटन क्षेत्र गाजवावे आणि देशाचा झेंडा दिमाखात फडकवावा.
आनंद द्विगुणित झालाय
माझ्या शाळेकडून करण्यात आलेल्या गौरवामुळे अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद द्विगुणीत झालाय. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सहकारी यांच्या पाठिंब्यामुळेच मला इथपर्यंत मजल मारता आली. पिंटो कुटुंबीयांकडूनही मोलाचे सहकार्य लाभले आहे. याक्षणी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असे भावुक उद्गार चिराग शेट्टी याने यावेळी काढले.


























































