मास्क वापरला नाही तर 200 रुपये दंड, पालिका जनजागरुकतेवर भर देणार   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱयांना शुक्रवार, 11 सप्टेंबरपासून 200 रुपयांचा दंड केला जाणार आहे. या आधी दंडांची रक्कम एक हजार रुपये होती. दंडाची ही रक्कम गोळा करताना गैरव्यवहार होऊ शकतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या हेतूबद्दल नाहक शंका उपस्थित केली जाऊ शकते, असे लक्षात आल्यावर दंडाची रक्कम 800 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱयांना हजार रुपयांचा दंड करत होते. गेल्या पाच महिन्यांत पालिकेने 2 हजार 798 जणांवर कारवाई केली असून त्यातून पालिकेने 27 लाख 48 हजारांचा दंड वसूल केला होता. दंडाची हजार रुपये ही रक्कम लोकांना मोठी वाटत होती तसेच ही दंडाची रक्कम वसूल करताना काही प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे लोकांमधील गैरसमज दूर करून कोरोनाविरोधात जनजागरुकता करण्याच्या पालिकेच्या मूळ हेतूला कुठेही बाधा येऊ नये, यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.