
हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून क्रिकेट मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दोन्ही संघांतील खेळाडू यूएईत होणाऱया आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इयान चॅपेल म्हणाले, कोरोनासारखे संकट याआधी केव्हाही आले नव्हते. अशा परिस्थितीत कशा प्रकारे क्रिकेट खेळता येईल याची चाचणी आयपीएलमध्ये करता येणार आहे. त्यामुळे महत्त्वाच्या मालिकेआधी हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया या देशांतील खेळाडूंना कोरोनातही कसे खेळायला हवे याचा अनुभव घेता येणार आहे. आयपीएल स्पर्धा ही दोन्ही देशांतील खेळाडूंसाठी रंगीत तालीम असेल असे म्हटले तरी यावेळी वावगे ठरणार नाही.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांबाबत इयान चॅपेल म्हणाले, कोरोनाचा इफेक्ट यजमान संघापेक्षा पाहुण्या संघावर अधिक होताना दिसणार आहे. बायोबबल, विलगीकरण, सामाजिक अंतर, खेळातील बदलणारे वातावरण या सर्व बाबींमुळे हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा कस लागेल हे निश्चित, पण विराटची सेना सर्व अडथळ्यांचा सामना करायला सज्ज झाली असेल. बोर्डर गावसकर ट्रॉफी, वर्ल्ड चॅम्पियनशिप यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी पणाला लागणार आहेत असेही इयान चॅपेल यावेळी आवर्जून म्हणाले.



























































