
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून या काळात चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरता येणार नाही. मात्र ही केवळ जमावबंदी असून नकीन लॉकडाऊन नाही, असे मुंबई पोलिसांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या जमावबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. मात्र कंटेन्टमेंट झोनमध्ये विनाकारण एकटय़ाला फिरता येणार नाही. राज्य सरकारने 31 ऑगस्ट रोजी जारी जमावबंदीच्या आदेशाला आता दोन आठवडय़ांसाठी मदुतवाढ देण्यात आली आहे.
जमावबंदीतून कोणाला वगळले
अत्यावश्यक सेवा आणि त्यातील कर्मचारी, शासकीय-निमशासकीय संस्था आणि त्यांच्याशी संबंधीत संस्था, अन्नपदार्थ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दूध, रेशन आणि किराणा सामान, रुग्णालये, मेडिकल, पॅथोलॉजी, नर्सिंग कॉलेज, टेलिफोन, इंटरनेट सेवा, इलेक्ट्रिक्स, पेट्रोलियम पदार्थ, बँक, शेअर बाजारातील कर्मचारी, आयटी, प्रसारमाध्यमे, बंदरे, होम डिलिव्हरी, मालवाहतूक.
मुंबईकरांनी घाबरू नये
मुंबई पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाही, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरू नये, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे केले आहे.




























































