
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर)च्या ट्रामा आयसीयूतील व्हेंटिलेटरला सोमवारी पहाटे अचानक आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, येथे कार्यरत असलेल्या परिचारिका आणि वॉर्ड बॉयने प्रसंगावधान राखत 15 रुग्णांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
‘सीपीआर’मध्ये सध्या 270 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यातील अनेक रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. येथील वेदगंगा इमारतीत ट्रामा केअर सेंटरच्या आयसीयू रुम नं. 2 मध्ये एका व्हेंटिलेटरमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन अचानक आग लागली. त्यावेळी डय़ूटीवरील परिचारिका आणि वॉर्ड बॉय यांनी तत्काळ ड्राय पावडरचा फवारा करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या रूममध्ये उपचार घेणाऱया 15 गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ अपघात विभागात हलविण्यात आले. या धावपळीत महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या एका जवानाच्या हाताला भाजल्याने तो जखमी झाला. यावेळी अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले.
रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी
आगीच्या घटनेत तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत होती. पण, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ‘सीपीआर’चे डीन मस्के यांनी स्पष्ट केले होते. मात्र, विजय कांबळे या रुग्णाच्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीची मागणी मुलांनी केली आहे. विजय कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे सांगून, त्यांच्या मुलांना ‘सीपीआर’मध्ये बोलाविण्यात आले होते. त्यांना या आगीबाबत काहीच माहिती नव्हती. वडिलांना अन्य वॉर्डात दाखल केल्याचे समजले होते; पण याच आग लागलेल्या रुममधून दाखल करताना अनेक रुग्ण घाबरले होते. यातूनच भीतीने वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी मुलगा विनायक कांबळे यांच्याकडून करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. या कक्षातील 15 रुग्णांना वेळीच सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी वा दुखापत झाली नाही. अग्निशमन दल, वरिष्ठ डॉक्टर, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांनी तत्काळ आग विझवली. – डॉ. चंद्रकांत मस्के, अधिष्ठाता.
जिल्हाधिकाऱयांची सायकलवरून धाव
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी दौलत देसाई तातडीने सायकलने ‘सीपीआर’मध्ये पोहोचले. आग लागलेल्या ट्रामा केअर सेंटरची पाहणी करून येथील रुग्णांना खासगी दवाखान्यात हलवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सीपीआर हॉस्पिटलमधील एकही वरिष्ठ डॉक्टर, निवासी डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यांनी जबाबदार डॉक्टरांना फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे फोन बंद होते. अखेर निवासी कर्मचारी पाठवून डॉक्टरांना बोलावून आणावे लागले.
























































