
जगातील कोरोनामुक्तांच्या यादीत हिंदुस्थानने आपला पहिला क्रमांक अबाधित राखला आहे. जगभरातील एकूण कोरोनामुक्तांपैकी तब्बल 21 टक्के लोक हे एकट्या हिंदुस्थानातील आहेत. देशात एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगलेच सुधारले आहे. तर कोरोनाचे मृत्यू रोखण्यातही लक्षणीय यश आले आहे. देशातील कोरोनाचा मृत्युदर जगात सर्वात कमी आहे, असा दावा शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला.
आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत 75,628 लोकांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 54 लाख 27 हजार 706 च्या पुढे गेली आहे. याचवेळी कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 83.84 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढत आहे. जगभरातील एकूण कोरोनामुक्तांपैकी 21 टक्के लोक हे एकट्या हिंदुस्थानातील आहेत. हा वेळीच निदान आणि प्रभावी उपचार याचाच सकारात्मक परिणाम असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जगातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 18.6 टक्के रुग्ण हिंदुस्थानात आहेत, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानातील कोरोनाचा मृत्युदर सर्वात कमी आहे. जागतिक पातळीवर कोरोनाचा मृत्युदर 2.97 टक्के आहे, याचवेळी हिंदुस्थानला या विषाणूमुळे होणारा मृत्युदर 1.56 टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आणण्यात यश आले आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाले. देशातील दिवसभरातील एकूण कोरोनामुक्तांपैकी 74.36 टक्के कोरोनामुक्तांची 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंद झाली.
आणखी 190 पोलिसांना कोरोनाची लागण; 24 तासांत दोघांचा मृत्यू
राज्यात शनिवारी आणखी 190 पोलिसांना कोरोनाची लागण झाली, तर 24 तासांत दोन पोलिसांचा मृत्यू झाला. राज्य पोलीस दलातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 20,871 जण कोरोनातून बरे झाले आहेत. एकीकडे पोलीस दलातील रुग्णसंख्या वाढत असली तरी रिकव्हरी रेट चांगला असल्याने कोरोनाची दहशत कमी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या केवळ 2,758 पोलीस कोरोनाचे ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्या 23,879 वर पोहोचली आहे. यातील 20,871 पोलिसांनी कोरोनावर मात केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. विषाणूने मागील 24 तासांत दोन पोलिसांचा बळी घेतल्याने पोलीस दलातील एकूण कोरोनाबळींचा आकडा 250 वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत 11 लाख 17 हजार 720 जणांनी कोरोनावर मात केली असून केवळ 2 लाख 63 हजार 313 कोरोनाग्रस्तांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. महामारीत 37,480 जणांना प्राण गमवावा लागला आहे.

























































