सामाजिक चळवळींचा आधारवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुष्पा भावे या गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सामाजिक प्रश्न आणि चळवळी यांच्याशी केवळ जोडल्याच गेलेल्या नव्हे तर त्या चळवळींचा आधारस्तंभ बनून राहिल्या. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी सुस्पष्ट वैचारिक भूमिका घेतली, परखड मतं मांडली. विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी भावे यांचा संपर्क होता.

मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली. सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठी विषय शिकवला आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांनी समाजात मिसळून कार्यकर्त्याची आणि समाजशिक्षकाची भूमिका बजावली.

पुरोगामी विचारांच्या प्रा. भावे यांनी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथर, एक गाव एक पाणवठा, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान दिले. शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्या महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांनी काढलेल्या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. आपल्या प्रभावशाली कार्याने स्त्रीवादी चळवळीला बळ देतानाच मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला त्यांनी वैचारिक मार्गदर्शन केले. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांच्या त्या समर्थक होत्या. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी आमूलाग्र काम केले. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये त्या अग्रभागी होत्या.

परखड नाट्य समीक्षक आणि लेखन
साहित्यात ‘नाटक’ हा पुष्पा भावे यांच्या विशेष आवडीचा प्रांत होता. परखड नाट्यसमीक्षक ही ओळख त्यांनी निर्माण केली. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांना पुष्पा भावे काय लिहितात याविषयी उत्सुकता असे. डॉ. श्रीराम लागू यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ हा ग्रंथाचे संपादन पुष्पा भावे यांनी केले. आधुनिक रंगभूमी आणि नवे भान देणारी समीक्षा यावर आधारित ‘रंग नाटकाचे’ हे पुस्तक भावे यांनी लिहिले. ‘गुडमुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला आहे. प्रा. भावे यांना सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनंतराव भालेकर स्मृती पुरस्कारही त्यांना मिळाला.