‘कोवीड 19’चा धोका सर्वाधिक कोणाला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सतीश नाईक (मधुमेहतज्ञ)

मधुमेह, हृदयविकार, स्थूल व्यक्ती यांना कोरोनाचा धोका जास्त आहे असे म्हटले जाते. काय आहे यामागची सत्यासत्यता…?

आज काल कोरोना काळात अशी शंका व्यक्त केली जाते ती म्हणजे मधुमेह, ह्दयविकार असलेल्यांना कोरोना होण्याचा धोका असतो का? हे खरंय का? तर हो, धोका असू शकतो, मात्र केव्हा आणि का याची कारणे काय ते पाहूया…

मधुमेह असलेल्या रुग्णांना धोका असण्याचे कारण मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल तीनही गोष्टी एकत्र असतात. बहुतेक मधुमेही रुग्णांमध्ये सगळ्यांमध्येच या गोष्टी एकत्र नांदतात म्हणजे एकत्र असतात. त्यामुळे लो लेवलचं इन्फ्लॅमेशन (दाह) येतं. हा दाह कोरोनामध्ये जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामध्ये असे रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. हा दाह ज्या रुग्णाला जास्त म्हणजे जेवढं अनियंत्रित मधुमेह तेवढं कोरोना होण्याची शक्यता जास्त असते.

हिंदुस्थानात असं आढळून आलं आहे की, रुग्ण दोन वर्षं, चार वर्षंही डॉक्टरकडे तपासण्याकरिता न जाता घरून औषधं मागून घेत राहतो. असं इतर देशांमध्ये चालत नाही. यामुळे रुग्णाला जर काही अडचण आली म्हणजे काही आजार असेल तर तो लक्षात येत नाही. मधुमेहाला सायलेंट किलर म्हणतात. यामध्ये माणसाच्या शरीरात काय चाललंय हे लगेच लक्षात येत नाही.

दात दुखायला लागला तरी लोक डॉक्टरकडे जातात. दातदुखीने जिवाला धोका झालाय असं काही नसतं. पण वेदना जाणवते. मधुमेह, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यामध्ये वेदना होत नाही. बाहेरून जरी हे कळत नसलं तरी शरीरात घडामोडी सुरू असतात. पण हे न जाणवल्यामुळे लोक डॉक्टरकडे जात नाहीत. कोरोनामुळे अशा रुग्णांना इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन होण्याची शक्यता जास्त असते.

मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यामुळे रुग्णाच्या हृदयावर आधीच परिणाम झालेला असतो. आताच्या काळात कोविडमध्ये अशा रुग्णांवर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

हृदयाला ऑक्सिजन कमी मिळाला तर ते लवकर अशक्त होतं. फुफ्फुसाचा काही भाग न्युमोनियाने व्यापलेला असतो. ऑक्सिजन कमी झाला की हृदय बंद पडण्याची शक्यता असते.

मधुमेहात काही वेळा हृदयाचे स्नायू कमकुवत झालेले असतात. तसेच दुसरा प्रकार आहे किडनीचा. यामध्ये कोरोनामध्ये मूत्रपिंडावर परिणाम होतो. मधुमेहामध्ये मूत्रपिंड बरीच कमजोर झालेली असतात. रुग्ण वेळच्या वेळी तपासणी करत नाहीत त्यामुळे आधीच परिणाम झालेला असतो. कोरोनामुळे तो वाढत जातो. मूत्रपिंडावर रक्तदाब आणि मधुमेहाचा फार मोठा परिणाम होतो.

मधुमेहात आपल्या देशाचा जगभरात दुसरा क्रमांक आहे. एवढी संख्या असल्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका असतो. ज्या देशांत असे रुग्ण कमी आहेत त्यांना कोरोनाचा धोका कमी प्रमाणात होऊ शकतो. इतर देशांपेक्षा आपल्याकडे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब असे विकार लोकांना दहा वर्षं लवकर होतात. हे जागतिक आकडेवारी आहे.

हा विचार करता आपल्याला काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. काळजी कशी घ्यावी?

  • आपल्याकडे कधीही कुठल्याही केमिस्टकडे जाऊन काही वर्षं औषध घेण्याची पद्धत आहे ती बंद व्हायला हवी.
  • डॉक्टरांचं महत्त्व वाढायला हवं.
  • रुग्णानेसुद्धा मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची वेळच्या वेळी तपासणी करावी.
  • लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
  • काही त्रास होत नाही म्हणून डॉक्टरकडे जाणं टाळू नका.
  • रक्तदाब, मधुमेहाची वेळच्या वेळी तपासणी करा.
  • बरेच लोक फक्त शुगर टेस्ट करतात. असेही करू नका, संपूर्ण चाचणी करून घ्या.
  • तपासणी करताना आलेल्या आकडय़ांचा अर्थ समजून घ्या. एक रुग्ण माझ्याकडे खूश होऊन आला. म्हणाला, माझी शुगर नॉर्मलला आली. औषधं वगैरे काही वर्षं तीच घेत होता. पण अधिक तपासणीवेळी लक्षात आलं त्याची किडनी दगावली होती. त्यामुळे काही औषध न बदलता ती घेत राहणे धोक्याचे असते. वेळच्या वेळी तपासणी करणे आवश्यक आहे.
  • वर्षानुवर्षे तीच औषधं घेत राहणं ही वाईट सवय आहे.
  • प्रगत देशांच्या वैद्यकीय सुविधांचा आपण विचार करायला हवाय.
  • वेळच्या वेळी तपासणी करून, योग्य ती औषधं घेऊन या आजारापासून दूर राहता येते.