
मुंबईत कोरोना काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रवासास मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी उपलब्ध असणाऱ्या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे गर्दी वाढत असल्याने कोरोना प्रसाराचा धोका वाढत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या आणि फेऱ्या वाढवा, अशी मागणी शिवसेना आमदार, मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे.
राज्य सरकारने रेल्वे सुरू करण्याबाबत प्रस्ताव दिला नसल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राज्य सरकार मुंबईतील कोविडची स्थिती लक्षात घेऊनच मुंबईकरांच्या हिताचा निर्णय घेईल, असे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील जनतेच्या हिताची बाजू मांडली आहे. सध्या 50 टक्के प्रवासी क्षमतेने रेल्वे सुरू आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा असताना गर्दी होते. त्यामुळे मुंबईत आधी रेल्वे, गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, त्यानंतर राज्य सरकार मुंबईत कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेईल, असेही सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.



























































