पालिकेच्या कोरोना नियंत्रणाचा धारावी पॅटर्न जगात गाजतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ला आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि मुंबईतील प्रचंड दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीत मात्र चांगलेच नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. धारावीत आतापर्यंत 3280 रुग्ण आढळले असले तरी यातील तब्बल २ हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या ठिकाणी आता फक्त 192 सक्रिय रुग्ण आहेत. पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केलेल्या या उपाययोजनांचे वर्ल्ड बँकेने कौतुक केले आहे. याआधी जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील जुलैमध्ये धारावीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

वॉिंशग्टनमधील संस्थेकडून करण्यात आलेल्या जागतिक सर्वेक्षणातून धारावीतील कोरोना नियंत्रणाचा लढा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत धारावी असली तरी या ठिकाणी प्रचंड दाटीवाटीने लोकवस्ती वसलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनली होती. मात्र पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबविण्यात आला. याला चांगलेच यश आले असून जुलैच्या तुलनेत धारावीत सद्यस्थितीत आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. पालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळेच धारावीत कोरोनावर नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे गौरवोद्गार वर्ल्ड बँकेने काढले आहेत.

देशात 57 लाख 44 हजार रुग्ण कोरोनामुक्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी देशात 72 हजार 49 नवे कोरोनाबाधित आढळल्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 67.57 लाख झाला आहे. यातील 57 लाख 44 हजार 693 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 82.02 टक्के झाला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनाने 986 मृत्यू झाले असून आतापर्यंत देशात कोरोनामुळे 1,04,555 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7.5 लाख जणांना कोरोना झाला असून 2 लाख 10 हजार जणांचे बळी गेले आहेत.

अशी राबवली मोहीम

  • पालिकेने कोरोना रोखण्यासाठी राबवलेल्या ‘धारावी पटर्न’मध्ये घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, स्क्रिंनग, ऑक्सिजन लेव्हल चेिंकग, कोविड सेंटरची उभारणी करून दिलेल्या दर्जेदार सुविधा, कोरोना हेल्थ सेंटरमध्ये लाफ्टर-योगा थेरपीसारखे प्रयोग, अद्ययावत उपचार पद्धती, संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण, सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून चार वेळा सॅनिटायझेशन करण्यात आले.
  • याशिवाय रुग्णाच्या क्लोज कॉन्टॅक्टचा शोध घेऊन परिणामकारक क्वारंटाइन अशा उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात गरीब-गरजू कुटुंबांना रेशन वाटप करण्यात आले. या कामात पालिकेला सामाजिक संस्थांनीदेखील सहकार्य केले. पालिकेने चिकाटी, सातत्याने प्रभावी उपाययोजना आणि लोकसहभाग-सहकार्यातून यश मिळाल्याचेही जागतिक बँकेने म्हटले आहे.