
मुंबईचे डबेवाले तसेच विदेशी दूतावासात आणि उच्चायुक्तातील कर्मचाऱ्यांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सध्या अत्यावश्यक सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेवर 431 तर पश्चिम रेल्वेवर 506 फेऱ्या दररोज चालविण्यात येत आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुंबईची लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी मर्यादित फेऱ्यांद्वारे चालविण्यात येत आहे. कोविड-19 परिस्थितीचा अंदाज घेऊन हळूहळू विविध अन्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समावेश करण्यात येत आहे. त्यात उद्यापासून मुंबईचे डबेवाले, विदेशी दुतावासातील आणि उच्चायुक्तातील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून रेल्वेच्या उपनगरीय लोकलसह सर्व पॅसेंजर सेवा ठप्प झाल्या होत्या. 15 जूनपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मर्यादित लोकल सेवांना परवानगी देण्यात आली आहे.
राज्य आणि केंद्र सरकारचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी व खाजगी वैद्यकीय कर्मचारी, पॅथोलॉजिकल लॅब आणि फार्मा स्टाफ, पोर्ट ट्रस्ट, कस्टम, मंत्रालय, महापालिका, राष्ट्रीय आणि सहकारी बँकांचे कर्मचारी, एअर क्राफ्ट मेन्टेनन्स, वीज कंपन्यांचे कर्मचारी आदींना लोकलप्रवासाची यापूर्वीच मुभा देण्यात आली आहे.























































