
लहान मुलांची भांडणे सोडविल्याच्या रागातून सराईत टोळक्याने तरुणावर कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना औंधमधील कस्तुरबा वसाहतीत बुधवारी रात्री 9.30 वाजता घडली. गुड्डया गायकवाड, अमिर शेख, अक्षय अडागळे, संकेत अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. तर आकाश गायकवाड असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गा नागनाथ गायकवाड (वय 39,रा. इंदिरा वसाहत, औंध) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कुटुंबियासह इंदिरा वसाहतीत राहायला आहे. 4 ऑक्टोबरला त्यांच्या परिसरात किरकोळ कारणांवरुन लहान मुलांची भांडणे सुरु होती. आकाशने मुलांची भांडणे सोडविली होती. त्याचा राग आल्यामुळे बुधवारी गुडडयाने आकाशला अडविले. भांडणात तू मध्यस्थी करतो, खूप मोठा भाई झाला का, आता तुला संपवून टाकतो असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत.



























































