
घरफोड्या, सोनसाखळी चोरीनंतर शहरात आता दुचाकी चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील विविध भागतील 5 दुचाकी चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकींचे पार्किंग कोठे करायच्या असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीही चोरण्यात आल्या आहेत.
धनकवडी परिसरात घरासमोर पार्क केलेली 25 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली आहे. चव्हाणनगरमधील पंचवटी सोसायटीसमोर ही घटना घडली. दुसऱ्या घटनेत वारजे जकात नाका परिसरात घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली आहे. तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी मार्कटयार्ड परिसरातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील एक दुचाकी चोरुन नेली. बिबवेवाडीतील इंद्रिरानगर परिसरातून दुचाकीची चोरी करण्यात आली आहे.
अस्वस्थ वाटल्याने थांबलेल्याची दुचाकी पळविली
दुचाकी चालवित असताना अचानक अस्वस्थ वाटून उलटी होत असल्याने रस्त्यावर बाजूला थांबलेल्या तरुणाची दुचाकी चोरण्यात आली आहे. ही घटना एअरपोर्ट रस्त्यावरील देवकर वस्तीजवळ घडली आहे. याप्रकरणी तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित तरुणाला उलटी आल्यामुळे त्याने दुचाकी थांबविली होती. मात्र, चाबी दुचाकीलाच ठेउन तो उलटी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला गेला असता, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी चोरुन नेली.



























































