
पाकिस्तानमधील ‘आयएसआय’ या गुप्तहेर संघटनेला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कारखाना व तेथे बनविण्यात येणाऱया लढाऊ विमानांसंबंधित संवेदनशील माहिती ओझर येथील एचएएलचा दीपक शिरसाठ हा कर्मचारी पुरवत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली असून न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच देवळाली येथील तोफखाना केंद्र परिसरात हेरगिरी करणाऱया बिहारी तरुणाला लष्करी अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले होते. एकापाठोपाठ एक अशा दोन घटना उघड झाल्याने पोलीस आणि लष्करी यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. हिंदुस्थानी बनावटीची विमाने, त्यांचा संवेदनशील तांत्रिक तपशील, त्याचबरोबर एचएएल कारखाना, तेथील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती शिरसाट आयएसआयला पुरवत होता.
तीन मोबाईल, पाच सिमकार्ड जप्त
एटीएसच्या पथकाने दीपक शिरसाठ याच्याकडील तीन मोबाईल हॅण्डसेट, पाच सिमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड जप्त केले आहेत. हे साहित्य अधिक विश्लेषण करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठविण्यात आले आहे.




























































